नाशिक – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्यावतीने अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २६ ते ३० मे या कालावधीत महाकवी कालिदास कलामंदिरात होणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्यावतीने ११ वर्षांपासून नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष डाॅ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या सौजन्याने अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयाेजन करण्यात येत असल्याची माहिती स्पर्धा प्रमुख तथा समन्वयक आनंद जाधव यांनी दिली. नाशिकसह राज्यभरातून या स्पर्धेत २४ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे माजी संचालक अजय आंबेकर, नाट्य परिषद नाशिक शाखेचे उपाध्यक्ष डाॅ. अनिरुद्ध धर्माधिकारी, निर्मला कुबल, विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्या उपस्थितीत होणार आहे. बक्षीस वितरणासाठी अभिनेत्री वंदना गुप्ते, अभिनेते संकर्षण कऱ्हाडे, तन्वी मुंडले, बालरंगभूमीच्या अध्यक्षा नीलम शिर्के हे उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेस २५ हजार रुपये राेख तथा फिरता करंडक, द्वितीय क्रमांकासाठी २० हजार रुपये राेख आणि सन्मानचिन्ह तर तृतीय संघासाठी १५ हजार रुपये राेख आणि सन्मानचिन्ह असे पारिताेषिक देण्यात येते. याशिवाय दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, प्रकाशयाेजना, लेखन, अभिनय (स्त्री आणि पुरुष) अशा विविध श्रेणींमध्ये वैयक्तिक पारिताेषिकांनीही कलाकारांना गाैरविण्यात येते. या वर्षी विनोदी एकांकिकेसाठी ११ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी विश्वंभर परेवाल, कृतार्थ कंसारा, विजय शिंगणे, राजेश भुसारे आदी परिश्रम घेत आहेत.
स्पर्धेचे वेळापत्रक
स्पर्धेत २६ मे रोजी दुपारी साडेचार वाजता कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघ, नाशिकतर्फे “द ब्रीज” ही एकांकिका सादर होईल. सायंकाळी सहा वाजता स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सत्रानंतर नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज हरिओम सांस्कृतिक संस्था – पिंडकौल, रंगतरंग युवा मंच, नाशिक – अंतिम सत्य , श्री राघवानंद मठ – चौकात या एकांकिका सादर होणार आहेत. मंगळवारी पूनम पाटील ॲक्टिंग अकॅडमी, नाशिक – संगीत वात्सल्य”, रिरा स्टुडिओज – मंजुळा”, सीमाताई हिरे परफॉर्मिंग आर्ट्स, नाशिक – प्रेम की यातना, सुबोध चित्र, कल्याण – क्वॉलिटी हरवलीय सर, बुधवारी प्रो.इवेंट्स , ठाणे – चानू, सूर्योदय कलामंच, लातूर – बेकार कुठले, रसाभियान, अहिल्यानगर – देखावा, कलासक्त, मुंबई – पेंडुलम, नाट्यरंग रसिक मंडळ, पुणे – अधर्म आणि नाट्यगंधर्व, डोंबिवली – सायलेन्स अफ्टर सॅक्रीफाईस” या तर ३० मे या स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी वैभवदीप नाट्य संस्था, सोलापूरतर्फे मैं हुं ना, नक्षत्र कलामंच, मुंबई – स्पर्शाची गोष्ट, स्वामी नाट्यांगण – द अनसीन व्हिजन, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स – संघर्ष आणि वारसा”, नाट्यपरिवार, ठाणेतर्फे इथे चूल कोणी मांडू नये या एकांकिका सादर होणार आहेत.