धुळे : येथील विधानसभा निवडणुकीतील (२०२४) मतदार यादीची छाननी केल्यावर तब्बल ४५ हजार मतदारांची नावे बेकायदेशीर मार्गाने समाविष्ट करण्यात आली असून ११ हजार मतदारांनी मृत्यू पश्चात मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे अशी माहिती शिवसेनेचे (उबाठा) ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली.या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे ते म्हणाले.

अनिल गोटे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यानुसार धुळे महानगरपालिकेचीही निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. भारतीय राज्यघटनेनुसार निवडणूक पारदर्शक व स्वच्छ वातावरणात पार पडणे अत्यावश्यक आहे. यासाठीच राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मतदार यादी, जी अचूक आणि शुद्ध असणे आवश्यक आहे. मात्र,धुळे विधानसभा २०२४ च्या निवडणुकीतील मतदार यादीची छाननी केल्यावर गंभीर अनियमितता आढळून आल्याचे समोर आले आहे. साधारणतः ४५ हजार मतदारांची नावे बेकायदेशीर मार्गाने यादीत समाविष्ट करण्यात आल्याची माहिती मिळाली असून, या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

धुळे विधानसभा मतदारसंघात निवडणुकीपूर्वी सुमारे २७ हजार दुबार व तिबार मतदारांची नोंदणी बीएलओंनी (बुथ लेव्हल ऑफिसर्स) बेकायदेशीरपणे केल्याचे ते म्हणाले. धुळे महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार अंदाजे १४,५०० मृत व्यक्तींची नावे अजूनही मतदार यादीत असल्याचे उघड झाले आहे, परंतु मागील दहा वर्षांत केवळ तीन हजार १७१ मतदारांना मृत म्हणून वगळण्यात आले आहे. यावरून सुमारे ११ हजार मृत मतदारांची नावे अजूनही यादीत कायम असल्याचे दिसून येते असे गोटे म्हणाले.

धुळे महानगरपालिकेची मतदार यादी संगणक प्रणालीद्वारे तयार केली जाते. देशभरातील निवडणुकीचे सर्व कामकाज संगणकीय पद्धतीने होत असताना, दुबार नावे, एकाच पत्त्यावर वेगवेगळ्या कुटुंबांची नोंद यांसारख्या बाबी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सहज ओळखता येऊ शकतात. त्यामुळे या प्रक्रियेत जर अशा प्रकारच्या चुका राहिल्या असतील, तर त्या संगणकावर लगेच शोधता येतात याची जाणीवही अनिल गोटे यांनी यावेळी करून दिली. या गंभीर बाबी संदर्भात स्वतंत्र अधिकारी नेमून मतदार यादीतील अनियमिततेची त्वरित चौकशी करण्यात यावी. तसेच महानगरपालिकेकडून मृत मतदारांची अद्ययावत यादी मागवून, त्यांच्या नावांची वजाबाकी करावी. निवडणूक आयोगाने ही जबाबदारी गांभीर्याने घेतली पाहिजे आणि संगणकीय पद्धतीद्वारे मतदार यादी शुद्ध करण्यात यावी, अशी मागणी गोटे यांनी केली आहे.

धुळे महानगरपालिकेच्या प्रभागांची यादी तयार करताना काही ठिकाणी एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात नोंदले गेले आहेत. तसेच वेगवेगळ्या कुटुंबातील मतदारांची नावे एकाच पत्त्यावर आढळल्याने यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर त्रुटी झाल्या असल्याचे स्पष्ट होते. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून योग्य दुरुस्ती केल्याशिवाय धुळे महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करू नये अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच मतदार यादीतील या गंभीर अनियमिततेमुळे नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली असून, निवडणूक आयोगाने यावर कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.