काँग्रेसची राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीसाठी पूर्वतयारी सुरू झाली असून लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे कांग्रेस नेतृत्व विधानसभा निवडणुकांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे दिली.

मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकांवर निवडणुका घेण्याच्या मागणीचा चव्हाण यांनी पुनरुच्चार केला. राष्ट्रवादीशी आघाडी करण्यासंदर्भात तत्त्वत: निर्णय घेण्यात आला असला, तरी जागा वाटपाविषयी प्रदेश कार्यकारिणी निर्णय घेईल. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे झालेल्या मत विभागणीचा भाजपला लाभ झाला. त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीत आघाडीबरोबर येण्याविषयी विचार करावा. त्यादृष्टीने त्यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कम्युनिस्टांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइंचे कवाडे, गवई गट या सर्वानी महाआघाडीत सामील होण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. मनसेला महाआघाडीत सामील करण्याविषयी पक्षात तात्त्विक मतभेद असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. भाजपने न पाळलेल्या आश्वासनांविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याविषयी लवकरच कार्यक्रम आखण्यात येणार आहे. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांकडून ६ जुलैपर्यंत सर्व जिल्ह्य़ांमधून अर्ज मागविण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.