लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : शहरातील क. का. वाघ शिक्षण संस्थेच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात स्थापत्य शाखेत दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अस्मिता पाटील (१८) या विद्यार्थिनीने वसतिगृहात केलेल्या आत्महत्येची त्वरित चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पोलिसांकडे केली आहे.

मंगळवारी पाटील यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली. जिल्ह्यात दाखल झालेल्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान सटाणा येथे अस्मिता यांचे पालक आपणास भेटले होते. त्यांनी मांडलेली व्यथा आणि अन्य काही बाबी आपण पोलीस आयुक्तांसमोर ठेवल्याचे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

आणखी वाचा-देवळा तालुक्यात धरणात बुडून युवकाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी अस्मिताने तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतिगृहात आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. दरम्यान, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून वसतिगृह प्रमुख आणि संस्था प्रशासनाविरुध्द आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अस्मिता ही सटाणा येथील सधन कुटुंबातील असून अभ्यासात अत्यंत हुशार होती. गुरुवारी गावाहून अत्यंत आनंदात परतलेली अस्मिता आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू शकत नाही. वसतिगृहात रात्रीतून असे काय घडले की तिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी पाहावा लागला. पोलीस किंवा नातेवाईक येण्याआधीच तिच्या खोलीचा दरवाजा तोडण्यामागील कारण काय, असा प्रश्न उपस्थित करुन तिचा घातपात करून आत्महत्येचा बनाव केला असण्याची साशंकता कुटुंबियांकडून व्यक्त होत आहे.