नाशिक : औरंगाबाद येथे शेवग्याच्या शेंगांना पहिल्यांदाच ४०० रुपयांपर्यंत विक्रमी दर मिळाला असताना नाशिक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर अर्थात शेतातून या मालाची प्रतवारीनुसार १३० ते १८० रुपये किलोने खरेदी होत आहे. या व्यवहारात व्यापारी चांगलीच नफेखोरी करीत असल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. तथापि, हे आक्षेप तथ्यहीन असून तुटवड्यामुळे यंदा कधी नव्हे इतका दर मिळाल्याचा दावा व्यापारी, बाजार समितीकडून केला जात आहे.

  चालू हंगामात तुटवड्यामुळे शेवग्याचे दर वधारल्याचा दावा केला जात होता. त्यानंतर व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या दराविषयी उत्पादकांमध्ये नाराजीची भावना पसरली.

मालेगावच्या डोंगराळे परिसरातील मनोहर खैरनार हे आठ वर्षांपासून शेवग्याचे उत्पादन घेतात. त्यांच्या म्हणण्यानुसार व्यापाऱ्यांची साखळी आहे. ते किती दर द्यायचा हे सकाळी निश्चित करतात. औरंगाबादचे भाव पाहिल्यावर व्यापारीवर्गाची नफेखोरी लक्षात येते. शुक्रवारी मालेगाव तालुक्यात शेतातच शेवग्याला १७० ते १८० रुपये दर मिळाला. सध्याचे धुके आणि दमट वातावरणामुळे शेवग्याची शेंग लालसर पडते. अशा मालास कमी भाव मिळणे समजण्यासारखे आहे. परंतु उत्पादक आणि ग्राहक यांमध्ये व्यापारी किलोमागे ५० ते १०० रुपये नफा मिळवतात, याकडे खैरनार यांनी लक्ष वेधले.

व्यापारी राजू अहिरे यांनी उत्पादकांचे आक्षेप खोडून काढले. मुळात शेवग्याची मुख्य बाजारपेठ मुंबई असून वाशी बाजार समितीतून परदेशासह देशांतर्गत बाजारात माल पाठवला जातो. हंगामाच्या सुरुवातीला आम्ही २५० ते २६० रुपये किलोने थेट शेतातून शेवग्याची खरेदी केली होती. आवक वाढल्यानंतर भाव कमी झाले. आता माल कमी होऊ लागल्याने ते पुन्हा वधारले, असे त्यांनी सांगितले.

मालेगाव कृ.उ.बा.  समितीचे सभापती भटू जाधव म्हणाले की, यावेळी मालाच्या तुडवड्यामुळे  जास्त दर मिळाला आहे. 

उत्पादकांचे म्हणणे…

शेवग्याला किती दर द्यायचा हे व्यापाऱ्यांची साखळी सकाळी निश्चित करते. भाव पाहिल्यावर व्यापाऱ्यांची नफेखोरी लक्षात येते. व्यापारी किलोमागे ५० ते १०० रुपये नफा मिळवतात.

व्यापाऱ्यांचा दावा…

हंगामाच्या सुरुवातीला २५० ते २६० रुपये किलोने थेट शेतातून शेवग्याची खरेदी केली होती. आवक वाढल्यानंतर भाव कमी झाले. आता आवक कमी होऊ लागल्याने दर पुन्हा वधारले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

   मागणी आणि पुरवठा, प्रतवारी यावर कृषिमालाचे दर निश्चित होतात. व्यापारी वर्गात खरेदीची स्पर्धा असते. त्यामुळे ते जादा नफा कमावतात, या आक्षेपात काही अर्थ नाही.   – भटू जाधव, सभापती, मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती