जळगाव : जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एप्रिल महिन्यात कृषी विभागाने सुमारे १८ लाख रुपयांचे प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी बियाणे जप्त केले होते. त्यानंतर आता पुन्हा चोपड्यातच १२ लाख ७२ हजारांचे एचटीबीटी बियाणे जप्त करण्यात आले. विक्रेत्यांचे गुजरातसह मध्य प्रदेशात धागेदोरे असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील शेतकरी साधारणपणे मे महिन्याच्या प्रारंभी पूर्वहंगामी उन्हाळी कपाशीच्या लागवडीला सुरूवात करतात. त्यादृष्टीने यंदाही सर्वत्र कपाशी लागवडीची लगबग सुरू झाली असताना, गुजरातसह मध्य प्रदेशातून चोरट्या मार्गाने जिल्ह्यात विक्रीसाठी आलेले प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे अनेक ठिकाणी उपलब्ध होत आहे. एचटीबीटी कपाशीच्या बियाण्याचा वापर केल्यामुळे तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करणे सहज शक्य होते. त्यामुळे निंदणीसाठी लागणाऱ्या मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होतो.

मजुरांची अनुपलब्धता असली तरी काही फरक पडत नाही. याकारणांमुळे अनेक शेतकरी बेकायदेशीर मार्गाने आणि छुप्या पद्धतीने विक्रीसाठी आणल्या गेलेल्या एचटीबीटी बियाण्यांची खरेदी करतात. वास्तविक, त्या बियाण्याला केंद्र सरकारची अधिकृत परवानगी नाही. विशेष म्हणजे सदरचे बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला कोणतीच पावती दिली जात नाही. परिणामी, पुढे जाऊन उगवण क्षमता किंवा उत्पादनाविषयी काही अडचणी निर्माण झाल्यास कोणाकडे तक्रार देण्याची सोय नाही. तरीही शेतकरी दलालांच्या जाळ्यात अडकून कपाशीचे एचटीबीटी बियाणे जास्तीचे पैसे देऊन खरेदी करताना दिसून येत आहेत. तणनाशकाचा सातत्याने आणि प्रमाणाबाहेर वापर झाल्यास जमिनीचा पोत बिघडतो. आणि दीर्घकालीन शेतीला धोका निर्माण होतो. त्यामुळे अल्पमुदतीचा फायदा घेण्यासाठी शेतकरी दीर्घकालीन नुकसानाला आमंत्रण देत आहेत.

शेतांमध्ये बियाणे लपवून ठेवण्याचा प्रकार

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एप्रिल महिन्यात पहिल्यांदा विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि चोपडा ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला होता. तेव्हा चुंचाळे-अक्कुलखेडा रस्त्यावरील शेतात पत्र्याच्या शेडमध्ये सुमारे १७ लाख ८२ हजार रुपये किमतीची प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्याची सुमारे १२७३ पाकिटे जप्त करण्यात आली होती.

काही दिवस उलटत नाही तेवढ्यात जिल्हा भरारी पथकाने चोपडा तालुक्यात कुरवेल येथे नदीच्या काठावरील आमराईत लपवून ठेवलेली एचटीबीटीची सुमारे १२ लाख ७२ हजारांची आणखी ८५० पाकिटे जप्त केली. जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांच्या तक्रारीवरून संबंधिताच्या विरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.