धुळ्याहून मुंबईला विक्रीसाठी नेले जाणारे १००० किलोपेक्षा अधिक गोमांस द्वारका चौकात पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोहत्या प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर गोमांस विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस यंत्रणेसह गायींच्या संरक्षणासाठी कार्यरत हिंदुत्ववादी संघटना प्रयत्न करत आहेत. याआधी नाशिक-पुणे महामार्गावर बिटको चौकात अशाच कारवाईत मोठय़ा प्रमाणात गोमांस पकडण्यात आले होते. त्यानंतर गोमांस वाहतुकीचा हा दुसरा प्रकार उघड झाला.

म्हाळसाकोरे येथील अहिंसा संघ समितीचे सदस्य व पशुकल्याण अधिकारी विकास गुंजाळ यांना धुळे येथून गोमांस द्वारका भागातून मुंबईकडे नेले जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी मुंबई नाका पोलिसांना ही माहिती दिली. त्याआधारे पोलिसांनी द्वारका चौकात पाळत ठेवली. यादरम्यान द्वारका पोलीस चौकीजवळ टाटा पिकअप टेम्पो आढळला. या वाहनाची तपासणी केली असता त्यात एक हजार ८०० किलो गोमांस असल्याचे निदर्शनास आले. चालक नवाज रशीद सय्यदला अटक करण्यात आली. या कारवाईत टेम्पोसह चार लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.