जळगाव – महायुतीचे सरकार स्थापन होऊन अनेक महिने उलटले तरी नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यात राजकीय कलगीतुरा देखील रंगला आहे. दुसरीकडे, भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत फडणवीस सरकारने तातडीने निर्णय घेत मोठा बदल केला आहे. गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांना तेथील जबाबदारी सोपवून संजय सावकारे यांना बुलढाणा देण्यात आले आहे.

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलल्याचा शासन आदेश सोमवारी रात्री राज्याचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी काढला आहे. आता भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यापूर्वी ते पद वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे होते. मात्र, जळगावहून भंडाऱ्याचे अंतर आणि वारंवार तेथे जाऊन कारभार पाहणे कठीण होत असल्याने सावकारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतःहून या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. त्यांच्या त्या विनंतीला मान देत त्यांच्याकडून भंडाऱ्याचे पालकमंत्रिपद काढून घेण्यात आले आहे.

मात्र, त्यांच्यावर बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रिपदाची नवीन जबाबदारी सुद्धा सोपविण्यात आली आहे. जळगावहून बुलढाणा जवळ असल्याने मंत्री सावकारे यांची आता सोय झाली आहे. शिवाय, सहपालकमंत्रीपद असल्याने त्यांना वस्त्रोद्योग खात्याकडे जास्त लक्ष देण्यास वेळ मिळू शकणार आहे.

दरम्यान, भंडाऱ्यातील जनतेचे अनेक प्रश्न होते. या सगळ्यामुळे भंडाऱ्यातील नागरिकांकडून आम्हाला स्थानिक पालकमंत्री हवा, अशी मागणी केली जात होती. त्यामुळे संजय सावकारे यांच्या जागी पंकज भोयर यांना भंडाऱ्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त केले आहे. प्रशासकीय कारणास्तव हा बदल करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे. या बदलामुळे भंडारा जिल्ह्यातील विविध विकास कामांना नवे गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रत्यक्षात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना, भाजपने भंडाऱ्याच्या पालकमंत्री पदात केलेल्या या बदलामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. विशेषतः भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजपची पकड आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीनेच ही जबाबदारी गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजपने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे विरोधक मात्र गोंधळले आहेत.

जळगावपासून लांब अंतरावर असलेल्या भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळताना खूपच कसरत करावी लागत होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी माझी अडचणी मांडली होती. –संजय सावकारे, वस्त्रोद्योग मंत्री