नाशिक – सुमारे सहा दशकांपूर्वी भार्डी ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन कोंढार गावाला स्वतंत्र ओळख मिळाली. परंतु, या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गटांमधील भोगवटदारांच्या नावाच्या ठिकाणी भार्डी हे जुनेच नाव कागदोपत्री कायम राहिले. म्हणजे गावाचे नाव कोंढार, परंतु, कागदपत्रावर ग्रामपंचायत भार्डी. यामुळे अनेक ठिकाणी कागदपत्रांच्या अडचणी येऊ लागल्या. विविध योजनांचे लाभ घेतानाही हे नाव अडथळा ठरू लागले. यावर नाशिक विभागाचे महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कायमस्वरुपी मार्ग काढला आहे.
सहा दशकांनंतर कोंढार हे नाव भोगवटदारांच्या सदरी लागणार आहे. नांदगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींपैकी एक भार्डी. १९६६ साली भार्डी गट ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन कोंढार गाव स्वतंत्र झाले. परंतु, भोगवटदारांच्या नावाच्या ठिकाणी जुनेच भार्डी नाव कायम राहिल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. कित्येक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. यावर कायमस्वरुपी मार्ग काढण्याचे गरजेचे होते. यासाठी नांदगाव तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत कोंढार आणि ग्रामपंचायत भार्डी यांनी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता केली. जिल्हा परिषदेने सकारात्मक अहवाल दिला होता. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव सादर करण्यात आला. प्रस्तावातील कागदपत्रांची छाननी आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित ग्रामपंचायत भार्डी हे नाव कमी करून ग्रामपंचायत कोंढार हे नाव भोगवटदारांच्या सदरी दाखल करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त गेडाम यांनी दिले. नांदगावच्या तहसीलदारांनी तत्काळ बदलाचे आदेश दिले. जवळपास सहा दशकांनी न्याय मिळाल्याची भावना कोंढार ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रुप ग्रामपंचायत कोंढार हद्दीतील परंतु ग्रुप ग्रामपंचायत भार्डी हे नाव दप्तरी लागलेल्या गट क्रमांक ८१/०१, ८४, ११८, १४७, १६३,१६४,२११,२१३,२३४,२३६ यांच्या उताऱ्यावर आता ग्रामपंचायत कोंढार हे नाव लागणार आहे. या ग्रामपंचायतीचे विभाजन होउनही दप्तरी भार्डी हेच नाव असल्याने अनेक अडचणी येत होत्या. ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार हे आदेश निर्गमित करण्यात येऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. – डॉ. प्रवीण गेडाम (विभागीय आयुक्त, नाशिक)