जळगाव : भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश घेण्यावर अलिकडे भर दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे (शरद पवार) बऱ्यापैकी वर्चस्व असलेल्या रावेर तालुक्यासही भाजपने आता सुरूंग लावला आहे. मंत्री गिरीश महाजन आणि आमदार अमोल जावळे यांची खेळी यशस्वी झाल्याने महाविकास आघाडी अक्षरशः खिळखिळी झाली आहे.
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ५० वे ग्रामीण अधिवेशन फैजपूर येथे डिसेंबर १९३६ मध्ये फैजपूर येथे स्वातंत्र्य चळवळीला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. काँग्रेसच्या त्या अधिवेशनामागे धनाजी नाना चौधरी यांचा मोठा सहभाग होता. खिरोदा (ता. रावेर) ही चौधरी परिवाराची कर्मभूमी. १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत भारत छोडो आंदोलनाने संपूर्ण देशात जोर पकडल्यानंतर धनाजी चौधरी यांना अटक झाली होती. त्याचबरोबर २५ विद्यार्थ्यांना कारागृहामध्ये डांबण्यात आले होते, ज्यामध्ये धनाजी चौधरी यांचे पूत्र मधुकरराव चौधरी यांचाही समावेश होता. वडिलांच्या निधनानंतर मधुकरराव चौधरी रावेरच्या राजकारणात सक्रीय झाले. आणि १९५७ मध्ये ते पहिल्यांदा काँग्रेसचे रावेर मतदारसंघातील आमदार बनले. त्यानंतर तब्बल २४ वर्षे राज्याच्या राजकारणात त्यांनी आपला दबदबा कायम राखला. १९९० मध्ये त्यांना विधानसभेच्या अध्यक्षपदाचा बहुमान देखील मिळाला. मंत्रिमंडळात १९५७ ते १९७८ दरम्यान २१ वर्षांच्या काळात मधुकरराव चौधरी यांनी १३ विभागांचे मंत्रीपद सांभाळले.
मधुकराव चौधरी यांच्यानंतर रावेर तालुक्याच्या राजकारणाची धुरा त्यांचे पूत्र शिरीष चौधरी यांनी खांद्यावर घेतली. २००९ मध्ये रावेरमधून ते पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकले. २०१९ च्या निवडणुकीतही त्यांनी भाजपचे हरिभाऊ जावळे यांचा पराभव करून पुन्हा रावेर तालुक्यावरील आपले वर्चस्व सिद्ध केले होते. २०२४ च्या निवडणुकीत मात्र शिरीष चौधरी यांनी स्वतः उमेदवारी नाकारून आपल्या मुलाला तिकीट देण्याचा आग्रह काँग्रेसकडे धरला. हीच संधी साधून भाजपने अमोल हरिभाऊ जावळे यांना बळ देऊन काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रावेर तालुक्याला सुरूंग लावला. तेव्हापासून काँग्रेसला डोके वर काढू देण्याची एकही संधी भाजपने दिलेली नाही. काँग्रेसची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांत आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आताही धडपड सुरू आहे.
दुसरीकडे, रावेरचे माजी आमदार अरूण पाटील यांना पुन्हा पक्षात घेऊन भाजपने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसला सुद्धा मोठा धक्का दिला होता. पाठोपाठ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणल्यानंतर आता शरद पवार गटाचे काही संचालक गळाला लावण्यात भाजप यशस्वी झाली आहे. ज्यामध्ये राजेंद्र चौधरी, गणेश महाजन, मुरलीधर महाजन, प्रकाश पाटील यांच्यासह बऱ्याच संचालकांचा समावेश आहे. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला रावेरमध्ये रोखण्यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांपासून बाजार समितीच्या संचालकांना आपल्या पक्षात प्रवेश देण्याचा धडाका भाजपने लावला आहे.