नाशिक – मुंबईत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणे ही विकृती आहे. यामागे जे असतील त्यांचा शोध घेतला जाईल. ही अतिशय दुर्देवी घटना आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली.
येथील महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्याच्या उद्घाटनानंतर महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या घटनेचा तपास गृहखात्याच्या माध्यमातून केला जाईल. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत.. ही विकृती असून जाणीवपूर्वक समाजात तणाव निर्माण करायचा आहे का, याबाबतही तपास केला जाईल यातून कुठेही तणाव निर्माण होऊ नये, याबाबत काळजी घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्हीची तपासणी करत ही व्यक्ती मानसिक रुग्ण की हेतुपूर्वक हा प्रकार करण्यात आला, याचा तपास केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
ठाकरे ब्रॅंड आता राहिलेला नाही. त्याचा बँड वाजला हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले ते खरे आहे. इंदिरा गांधी ब्रँड होते. आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी ब्रॅंड आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची गोष्ट वेगळी होती. ठाकरे ब्रँड आता नामशेष होत आहे. हातात हिरवे झेंडे घ्यायचे, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली द्यायची, हिंदुत्व विसरायचे, यामुळे आता लोकही त्यांना विसरले आहेत. मुंबईचा महापौर आता महायुतीचा असेल. मागीलवेळी देखील त्यांना शक्य नव्हते. परंतु, आमच्यामुळे ते शक्य झाले. उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना पूर्णपणे तिलांजली दिल्याने लोक आता निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवतील, असा इशाराही महाजन यांनी दिला.