जळगाव : महापालिकेतून वितरीत जन्म दाखल्यांवर तहसीलदारांच्या बनावट सह्या आढळल्याप्रकरणी ४३ जणांवर गुन्हा दाखल असून दोन वकिलांना अटक झाली आहे. या प्रकरणाचा मागोवा घेण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. तत्पूर्वी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान होते म्हणून मी सिल्लोडहून जळगावला सुखरूप पोहोचलो, अशी आपबिती त्यांनी सांगितली.
बनावट कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्रात सुमारे दोन लाख २४ हजार अपात्र, घुसखोर तसेच बेकायदेशीर व्यक्तींनी जन्म प्रमाणपत्र मिळविल्याचा आरोप करून संबंधितांच्या विरोधात लढा सुरू ठेवण्याचा निर्धार माजी खासदार सोमय्या यांनी केला आहे. त्यासाठी महाराष्ट्रात जेवढ्या काही ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे वितरीत झाली आहेत, त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे काम ते सध्या करत आहेत.
त्यानुसार, सोमवारी दुपारी त्यांनी जळगाव येथे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली. असे प्रकार केवळ जळगावातच नाही तर संपूर्ण राज्यात घडल्याचा संशय सोमय्या यांनी व्यक्त केला. पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्याशी जळगावमध्ये दाखल बनावट जन्म प्रमाणपत्रांविषयी गुन्ह्याच्या तपासाबाबत सविस्तर चर्चा केली.
जळगाव शहर महापालिकेत फेब्रुवारी महिन्यात तहसीलदारांच्या सहीने तब्बल ५० प्रकरणे जन्म प्रमाणपत्रांसाठी जन्म-मृत्यू नोंदणी विभागात दाखल झाली होती. मात्र, त्या प्रकरणांबाबत महापालिकेने संशय व्यक्त केल्यानंतर तहसील कार्यालयाने सर्व जन्म प्रमाणपत्रांची पुन्हा पडताळणी केली. तेव्हा केवळ सात दाखल्यांवर तहसीलदारांची अस्सल सही आढळून आली.
उर्वरित ४३ प्रमाणपत्रांवर बनावट सही आणि शिक्के असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या संशयितांवर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आल्यानंतर ३५ जणांची चौकशी झाली. त्यानुसार, संशयित वकील शेख मोहम्मद रईस बागवान, शेख मोहसीन शेख सादिक मणियार यांनी तहसीलदारांच्या बनावट सहीचे दाखले अन्य संशयितांना उपलब्ध करून दिल्याचे तपासात आढळून आले होते. या संदर्भात, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
जळगावमध्ये येण्यापूर्वी त्यांच्या वाहनावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोडमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काही जणांकडून हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सिल्लोडमध्ये आपण पोलिसांसह उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांकडे तेथील ११०० बनावट जन्म प्रमाणपत्रांचे पुरावे सादर केले आहेत. त्यामुळेच आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.
हल्लेखोर माझ्या मोटारीपर्यंत पोहोचले होते. परंतु, ऐनवेळी केंद्रीय औद्योगिक सरक्षा दलाचे जवान (सीआयएसएफ) धावून आल्याने मी सुखरूप जळगावपर्यंत पोहोचलो. माझ्यावर हल्ला करणारे ठाकरे गटासह काँग्रेस, एमआयएम किंवा अब्दुल सत्तार यांचे कार्यकर्ते असतील, तर त्यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी. पोलिसांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेतली नाही. सिल्लोड पोलीस राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला.