धुळे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या “मतचोरी” आणि “व्होट जिहाद” या मुद्द्यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून धुळे जिल्हा पुन्हा एकदा राज्यातल्या राजकारणात चर्चेत आले आहे. भाजप आमदार अमित साटम यांनी मविआ आणि मनसेवर टीका करत लोकसभा निवडणुकीतील दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी सादर केली आहे. या आकडेवारीत धुळे लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख आला आहे.

साटम यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, धुळे लोकसभा मतदारसंघात तब्बल ४५,७९७ दुबार मुस्लिम मतदार नोंदवले गेले, तर संबंधित निवडणुकीत उमेदवाराचा विजय केवळ ३,८३१ मतांच्या फरकाने झाला. हा फरक आणि दुबार मतदारांची संख्या लक्षात घेता, निवडणुकीच्या निकालावर या त्रुटींचा थेट परिणाम झाला असावा, असा साटम यांचा दावा आहे. त्यामुळे “हा मतचोरीचा प्रकार आहे की व्होट जिहाद?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

याशिवाय बीड, अमरावती, मुंबई उत्तर-मध्य आणि मुंबई उत्तर-पूर्व या मतदारसंघांतही मोठ्या प्रमाणात दुबार मुस्लिम मतदारांची नावे आढळली असल्याचा आरोप साटम यांनी केला. त्यांनी सांगितले की, बीडमध्ये ६७,६७९, अमरावतीत २८,२४५, मुंबई उत्तर-मध्यमध्ये ५९,८०५ आणि उत्तर-पूर्वमध्ये ३८,७४४ दुबार मतदार नोंदले गेले होते असेही साटम यांनी म्हटले आहे. साटम यांनी निवडणूक आयोगाकडून याबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे. “जर मतदार यादीतील या त्रुटी कायम राहिल्या, तर लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल,” असे त्यांचे म्हणणे आहे.

धुळे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून मतदार नोंदणीतील विसंगती, दुबार नावे आणि वगळलेल्या मतदारांविषयी तक्रारी वाढल्या आहेत. स्थानिक पातळीवर विविध पक्षांकडून मतदार यादीतील पारदर्शकतेची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे आता साटम यांच्या वक्तव्यामुळे धुळे पुन्हा राज्याच्या राजकीय चर्चेत झळकू लागले आहे. दरम्यान, विरोधकांनी साटम यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मविआ नेत्यांनी भाजपवर निवडणुकीपूर्वी धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप केला आहे. “लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याऐवजी भाजप राजकीय फायद्यासाठी धार्मिक भावनांना खतपाणी घालत आहे,” असा प्रतिवार विरोधकांकडून होतो आहे.

धुळे जिल्ह्यातील मतदारसंख्या आणि धार्मिक समीकरणांचा विचार करता या प्रकारचे आरोप स्थानिक पातळीवरील निवडणूक प्रचारावर थेट परिणाम करू शकतात. विशेषत: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साटम यांचे वक्तव्य हा चर्चेचा आणि वादाचा केंद्रबिंदू ठरू शकतो. स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांमध्ये या विषयावर मतमतांतरे सुरू झाली असून, धुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे.