जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी शुक्रवारी केला. सदर महिलेच्या तक्रारीवरून संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात, शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपस्थित राहिल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी एका महिलेच्या बाबतीत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या गंभीर प्रकाराची माहिती दिली. तसेच सदर महिलेला पोलिसात तक्रार केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी स्थानिक गुन्हे शाखेचा निरीक्षक आणि त्याचा कुटुंबियांकडून देण्यात येत आहे. आमदाराकडे तक्रार करण्यासाठी गेल्यास त्यांनाही बंदुकीची गोळी मारण्याची धमकी निरीक्षक देत असल्याचे चव्हाण यांनी नियोजन समितीच्या निदर्शनास आणून दिले. त्यासंदर्भात आपल्याकडे ध्वनीमुद्रीत पुरावा असल्याचेही त्यांनी म्हटले.

जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या महत्वाच्या पदावरील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाकडून अशा पध्दतीने महिलांचे शोषण होत आहे. तसेच आमदारांसारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीला बंदुकीची गोळी घालण्याची धमकी त्यांच्याकडून देण्यात येत असेल, तर ही बाब अतिशय गंभीर आहे. या सर्व प्रकारात संबंधित निरीक्षकाला जळगाव येथील एक व्यक्ती मदत करत होती. त्याचीच गाडी आणि सिमकार्ड गुन्ह्यामध्ये वापरले जात होते. तोच पीडित महिलेची जाण्याची, येण्याची आणि राहण्याची सर्व व्यवस्था करत असे. त्यामुळे ती व्यक्ती देखील या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात सहआरोपी आहे. कुणाला घाबरत नाही, पालकमंत्री आणि आमदार माझ्या खिशात आहेत. पोलीस अधीक्षकांकडे जा किंवा महानिरीक्षकांकडे, माझे कुणी काही करू शकत नाही. अशा धमक्या निरीक्षकाकडून देण्यात येत होत्या, याकडेही आमदार चव्हाण यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

त्याच प्रमाणे संबंधित निरीक्षकाला स्थानिक गुन्हे शाखेतून तातडीने हटविण्याची मागणी त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. प्रत्यक्षात, संबंधित वादग्रस्त निरीक्षकाची शुक्रवारी सायंकाळी तातडीने उचलबांगडी करण्यात आल्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी काढल्याचे सांगण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या वादग्रस्त निरीक्षकावरील कायदेशीर कारवाई संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्याशी संर्पक साधला असता, त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही.