नाशिक – जिल्ह्यात शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. शेतकऱ्यांना युरिया मिळेनासा झाला असताना निफाड तालुक्यात युरियाचा काळाबाजार पोलिसांनी उघड केला असून २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी मंगळवारी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दरवर्षी शेतकऱ्यांना युरियाची टंचाई जाणवत असते. युरियाला असलेली मागणी लक्षात घेऊन काही जणांकडून त्याची साठवणूक केली जाते. तर काही जण काळ्याबाजारात त्याची विक्री करीत असतात. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निफाड तालुक्यात मंगळवारी पहाटे काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारा युरियाचा साठा पकडला. लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव रस्त्यावरील भरवस फाटा येथे एका वस्तीवर हा प्रकार उघड झाला. केंद्र शासनाचा अनुदानित प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परीयोजना शिक्का असलेल्या एका गोणीतून दुसऱ्या खासगी गोणीत युरिया भरलेल्या ४०० ते ५०० गोण्या एका मालवाहतूक वाहनात आढळल्या. या गोण्या काळ्याबाजारात विकण्यासाठी २० लाख रुपयांच्या गोण्या निफाडहून मुंबईत एका कंपनीत नेण्यात येणार होत्या. युरियाने भरलेली मालमोटार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निफाड येथे पकडली. संशयितासह चालक, सहचालक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया मिळावा म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परीयोजना सुरु केली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना युरियाची गोणी २८० रुपयांना मिळते. शेतकऱ्यांना युरिया खत विक्री दुकानांमधून मुबलक मिळत नाही. आधारकार्ड लिंक करून युरिया घ्यावा लागतो. काही दुकानदार माफियांना युरियाची गोणी दोन हजार रुपयांना विकतात. युरियाची हीच गोणी संबंधितांकडून मुंबईत कंपनीला पाच हजार रुपयांना विकण्यात येत आहे. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.