मुंबई ते आग्रा महामार्गावरील चिंचवे गावाजवळ चौफुलीवर सोमवारी सकाळी नाशिकहुन मालेगावकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसची पाठीमागून मोटारीला जोरदार धडक बसली. अपघातात जीवितहानी झाली नसली तरी मोटारीचे नुकसान झाले आहे. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात आली.

हेही वाचा >>> नाशिकरोड कारागृहातील लाचखोरी उघड – दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोलीस कोठडी

नाशिक ते मालेगाव दरम्यान महामार्गाववर असलेल्या चिंचवे गावाजवळ सकाळी ११ वाजता हा अपघात झाला. याठिकाणी तीव्र उतार असल्याने वारंवार अपघात होत असतात. बसची मोटारीला धडक बसल्यानंतर प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. चालकाने प्रसंगावधान राखत बस सेवारस्त्यावर थांबवली. बसमध्ये ५० ते ५५ प्रवासी होते. घटनास्थळी सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी बसमधील प्रवाशांना पुढील प्रवासासाठी मदत केली. देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक गतीरोधक तसेच उतारावर गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवत नसल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, या ठिकाणी नेहमीच अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या अपघात क्षेत्राच्या जागेवर संबंधित विभागाने योग्य त्या उपाय योजना कराव्यात अन्यथा चिंचवे गावाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.