जळगाव – बाह्यवळण महामार्ग एकदाचा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर नवी मुंबईच्या धर्तीवर नवे जळगाव उत्तर दिशेला विकसित होण्याची चिन्हे दिसून आली आहेत. दरम्यान, बाह्यवळण महामार्ग थेट समृद्धी महामार्गाशी जोडण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. केंद्र सरकारने तरसोद किंवा नशिराबादहून विमानतळाकडे जाणारा मधला रस्ता तयार करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून माहिती देखील मागवली आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जळगाव शहर जोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थितीत नागपूर येथे जून महिन्यात पार पडलेल्या बैठकीत झाला आहे. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या प्रवासाला गती देतानाच जळगावहून समृद्धी महामार्गाने मुंबईला किंवा नागपूरला फक्त पाच तासात कसे पोहोचता येईल, त्यादृष्टीने बैठकीत चर्चा झाली आहे. सद्यःस्थितीत जळगावहून अजिंठा, सिल्लोडमार्गे छत्रपती संभाजीनगरला पोहोचण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. हा रस्ता समृद्धी महामार्गाशी जोडण्यापूर्वी जळगाव-छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास अवघ्या एका तासावर आणण्याचे ठरले आहे. छत्रपती संभाजीनगरहून मुंबई किंवा नागपूरला समृद्धी महामार्गाने पोहचण्यासाठी चार तास लागतात. जळगाव-छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या प्रवासाचा एक तास आणि पुढील प्रवासाचे चार तास गृहीत धरले तर केवळ पाच तासात जळगावहून मुंबई किंवा नागपूरला पोहोचणे त्यामुळे शक्य होणार आहे.
या पार्श्वभूमीवर, नव्याने सुरू झालेल्या पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्गाशी जोडल्या जाणाऱ्या प्रस्तावित रस्त्याचे महत्व आता वाढले आहे. सदरचा जोड रस्ता बाह्यवळण महामार्ग जेथे संपतो, तेथून म्हणजे तरसोद फाट्यावरून किंवा पुढे नशिराबाद जवळून थेट विमानतळाकडे निघेल. जेणेकरून धुळे-नागपूर (एनएच ५३) आणि जळगाव-छत्रपती संभाजीनगर (एनएच ७५३ एफ) हे दोन्ही महामार्ग एकमेकांशी मधल्या कमी अंतराने जोडले जातील. पाळधी-तरसोद बाह्यवळण मार्गावरून विमानतळाकडे किंवा पुढे अजिंठा-छत्रपती संभाजीनगर जाण्यासाठी वाहनधारकांना जळगाव शहरातून जाण्याची गरज भासणार नाही. पुढे समृद्धी महामार्गावरून नागपूर किंवा मुंबईकडे जाण्याचा पर्याय देखील खुला असेल. त्या दृष्टीने तरसोद किंवा नशिराबादहून विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्याची व्यवहार्यता तपासली जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून त्यासंदर्भात जळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाला पत्रही पाठवण्यात आले आहे.
खासदार स्मिता वाघ यांचा पाठपुरावा
तरसोद किंवा नशिराबादहून विमानतळाला जोडणारा मधला रस्ता तयार करण्यासाठी खासदार स्मिता वाघ यांनी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला आहे. त्यांनी डिसेंबर २०२४ मध्ये गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिलेल्या पत्रानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून लगेच दखल घेण्यात आली. जळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाला प्रस्तावित रस्त्याची लांबी, रूंदी संदर्भात माहिती काढण्याचे आदेशही देण्यात आले. जळगावच्या विकासाला चालना देणाऱ्या त्या रस्त्याला चालना देण्याची गरज व्यक्त होत आहे.
धुळे-नागपूर महामार्गावरून थेट जळगाव विमानतळाला जोडणारा मधला रस्ता तयार करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून त्या संदर्भात आवश्यक ती सर्व माहिती मागवण्यात आली आहे. – स्मिता वाघ (खासदार, जळगाव)