जळगाव – जिल्ह्यात विविध कारणांनी रखडलेल्या पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्गाचे प्राथमिक बांधकाम अखेर पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता गुणवत्तेसह वाहतूक चाचणी, कोटिंग, दिशादर्शक फलकांची उभारणी आणि विद्युतीकरण ही काही अंतिम टप्प्यातील कामे केली जाणार आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाळधीपासून तरसोदपर्यंत स्वतः गाडीने प्रवास करत या संपूर्ण मार्गाची नुकतीच पाहणी केली.
इंदूर येथील अग्रोह इन्फ्रा या कंपनीने पाळधी ते तरसोद दरम्यानच्या बाह्यवळण महामार्गाचे काम हाती घेतले आहे. एकूण १७.७० किलोमीटर लांबीच्या या मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला सुरुवातीला २६ महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, भूसंपादनासह इतर बऱ्याच कारणांमुळे सदरचे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, बराच आटापिटा केल्यानंतर आता कुठे बाह्यवळण महामार्गाचे काम मार्गी लागत आहे.
जळगाव शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले होते. शेवटी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व सूत्रे हातात घेऊन बाह्यवळण महामार्गाकडे विशेष लक्ष दिले. त्यांच्याच पुढाकारामुळे रखडलेल्या कामास काही प्रमाणात चालना सुद्धा मिळाली.
जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटदारास पावसाळा सुरू होण्यापूर्वीच सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, मे महिन्यात वळवाचा पाऊस पडल्याने रखडलेली कामे पूर्ण करण्यात कंत्राटदाराला मर्यादा आल्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह खासदार स्मिता वाघ यांनी दरम्यानच्या काळात स्वतः पाहणी करून बाह्यवळण महामार्गाचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. त्यानंतर गिरणा नदीवरील सर्वात मोठ्या पुलासह पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मार्गावरील तसेच कानळदा, ममुराबाद आणि आसोदा रस्त्यावरील उड्डाणपुलांच्या कामांना गती मिळाली. आता सर्व उड्डाणपुलांवरून कंत्राटदाराची वाहने धावू लागली आहेत. सेवा रस्त्यांसह संरक्षक कठडे, रंगरंगोटी, विद्युतीकरण या कामांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सल्लागार चित्ररंजन खेतान यांनी पाळधीपासून नव्याने बांधलेल्या तरसोद पुलापर्यंत गाडीने प्रत्यक्ष प्रवास करत संपूर्ण मार्गाची संयुक्त पाहणी केली. बाह्यवळण महामार्गाचे प्राथमिक बांधकाम पूर्ण झाले आहे. आता गुणवत्ता परीक्षण केले जाईल. त्यानंतर रीतसर लोकार्पण करून महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. परंतु, गुणवत्ता चाचणी पूर्ण होईपर्यंत बाह्यवळण महामार्ग अधिकृतपणे वाहतुकीसाठी खुला नाही. त्यामुळे वाहनचालकांनी त्याचा वापर करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.