धुळे : सभासद आणि ठेवीदार यांचा विश्वासघात करुन १३ कोटी ७५ लाख ८६ हजार २५३ रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी शिरपूर मर्चंटस को-ऑपरेटिव्ह बँकेचे तत्कालीन कर्ज अधिकारी, लेखापाल आणि वसुली अधिकाऱ्यांसह कर्जाची परतफेड न करणाऱ्या तब्बल ४९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात सनदी लेखापाल अजय राठी यांनी तक्रार दिली आहे. राठी यांना वैधानिक लेखापरीक्षणाचे नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यांनी दि शिरपूर मर्चंटस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या लेखापरीक्षणाचे कामकाज सुरु केले. बँकेतर्फे वाटप करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणांमध्ये अनेक धक्कादायक प्रकार घडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशयास्पद प्रकरणांपैकी एक कर्ज प्रकरण हर्षद जैन (रा. शिरपूर) यांच्याशी संबंधित असून ते बँकेचे तत्कालीन अध्यक्ष प्रसन्ना जैन यांचे बंधू आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे संचालकांनी त्यांच्या नातेवाईकांना कर्ज देणे प्रतिबंधित असतानाही प्रसन्ना जैन यांनी बँकेचे व्यवस्थापक संजय कुलकर्णी (रा. शिरपूर) यांच्याशी संगनमत करुन हर्षल जैन यांना विनातारण कर्ज दिले. एक एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीतील वैधानिक लेखापरीक्षणात हा प्रकार उघड झाला.
सनदी लेखापाल राठी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हितेश जैन, एकनाथ भंडारी, केतनकुमार जैन, श्रीराम विठोबा, शांतीलाल जैन, खुदाबक्ष तेली, दिलीपकुमार अग्रवाल, गिरीजा भागवत, गिरीश भागवत, गोविंदलाल अग्रवाल, प्रमोद धाकड, हितेश जैन, भगवान अग्रवाल,
शेख खतीब, जतीन जैन, संगिता शाह, सचिन शाह, शेख कामील, सुरेश अहिरे, अमोल जैन, भूषण चौधरी, चंचालाल पटेल, रमेश कमलानी, प्रवीण देशमुख, हर्षद जैन, रामेश्वर अग्रवाल, जितेंद्र गिरासे, रितेश जयस्वाल, नितीन माळी, भगवान दलाल, सुरेशलाल गुजराती, जया जैन, अमरदीप सिसोदिया, प्रकाश चौधरी, रवींद्र चौधरी, जतीन जैन, दिलीप धाकड, मंगलसिंग जाधव, राजेंद्र अरुजा, सौरव भंडारी, जयपाल गिरासे, निखील अग्रवाल, निमराज चौधरी आणि सिध्दार्थ थोरात (सर्व रा.शिरपूर,जि.धुळे) या कर्जदारांनी बँकेकडून कर्ज घेतले. परंतु, कर्जाची मुदतीत परतफेड केली नाही. बहुतेकांनी तर कर्ज ज्या व्यवसायासाठी घेतले, तो व्यवसाय केला नाही. आणि कर्जाची रक्कम दुसरीकडेच वळविली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
एवढेच काय, कर्ज विनातारण घेतले. मध्यंतरीच्या काळात बँकेच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी पुष्कळशी कर्ज प्रकरणे तारणी झालेली आहेत. अथवा कर्जाची परतफेड झालेली आहेत. बँकेचे अध्यक्ष प्रसन्ना जैन, व्यवस्थापक संजय कुलकर्णी, महेश गुजराथी, दिलीप कापडी (सर्व रा. शिरपूर, जि धुळे) तसेच तत्कालीन कर्ज अधिकारी, लेखापाल, वसुली अधिकारी, कर्जधारकांनी बँकेशी संगनमत करुन विनातारण विविध कारणांसाठी कर्ज घेऊन त्या कर्जाची नियमाप्रमाणे परतफेड न करता बँक सभासद व ठेवीदार यांचा विश्वासघात केला. यातून बँकेचे सभासद व ठेवीदारांची १३ कोटी ७५ लाख ८६ हजार २५३ रुपयांना फसवणूक झाली. या तक्रारीवरुन शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.