जळगाव – सत्र न्यायालयाने ११ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात येथील ला. ना. विद्यालयाचे माजी क्रीडाशिक्षक डॉ. प्रदीप तळवेलकर यांच्यासह त्यांच्या आठ सहकार्यांविरुद्ध शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी शासनाची फसवणूक केल्याने सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस ठाण्याचे प्रभारी तथा सहाय्यक निरीक्षक कैलास पवार तपासाधिकारी आहेत.
हेही वाचा- जळगाव जिल्हा दूध संघासाठी ठकसेन पाटलांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य; नाशिकच्या विभागीय उपनिबंधकांचा निकाल
संघटक तथा विविध क्रीडा संघटनांवर कार्यरत असलेले जळगावचे फारुक शेख अब्दुल्ला यांनी यांसदर्भात तक्रार दाखल केली होती. शासनाची डॉ. तळवेलकर आणि इतरांनी संगनमत करून कशा प्रकारे फसवणूक केली, त्याची माहिती कागदपत्रांसह शेख यांनी दिली. १६ वेळा शाळेच्या हजेरीपत्रकावर स्वाक्षरी असतानाही त्याच काळात जळगाव जिल्ह्याबाहेर विविध स्पर्धांसाठी पंच, निवड समिती सदस्य व आयोजक म्हणून डाॅ. तळवेलकर यांनी प्रमाणपत्रे मिळविली होती. जळगावच्या सहायक धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात नोंदणीकृत पाच क्रीडा संघटनांचे इतर बनावट दस्तऐवज सादर केले. २००७ ते २०१३ या कालावधीत तलवारबाजीच्या १० स्पर्धांतील प्रमाणपत्रे, तसेच ४९ प्रमाणपत्रांवर डॉ. तळवेलकर यांनी एकाच वेळी दोन-तीन ठिकाणी उपस्थित दर्शविले. त्यामुळे एकच व्यक्ती वेगवेगळ्या तीन स्पर्धांसाठी जिल्ह्यात नव्हे तर राज्यात उपस्थित असल्याचे प्रमाणपत्रांवरून दिसून आले. जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या ३४ प्रमाणपत्रांवर स्पर्धेत तांत्रिक पंच म्हणून उपस्थित दाखविले. मात्र, त्या अवधीत इतर ठिकाणीही उपस्थिती असल्याचे दाखविले आहे. एवढेच नव्हे; तर या ३४ प्रमाणपत्रांवर दोन सचिवांच्या वेगवेगळी स्वाक्षरी असून, मूळ सचिवाची एकही स्वाक्षरी नाही.
चर्चासत्रातील सहभाग, स्पर्धेतील कार्यमुक्तीचे आदेश व आभाराच्या एकूण २५ पत्रांचा मजकूर एकसारखा असून, हस्ताक्षरसुद्धा एकच आहे. क्रीडांगण तयार करणे, व्यायामशाळा तयार करणे याचे जे प्रमाणपत्र सादर केले आहे, तेसुद्धा बनावट आहे. तक्रारीत छाननी समितीने डॉ. तळवेलकर यांना गुण देताना नियमानुसार तपासणी न करता गुण दिलेले आहेत. क्रीडा व युवा सेवा संचालकांना तक्रार देऊनही त्यांनी चार वर्षे चौकशी केली नाही. त्यामुळे त्याअधिकार्यांचीही चौकशी करावी, असेही शेख यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
हेही वाचा- विमान प्रवासासाठी मुंबई, शिर्डीकडे धाव; धावपट्टी दुरुस्तीमुळे नाशिकची सेवा बंद
प्रथमदर्शनी नऊ संशयित
ला. ना. विद्यालयाचे माजी क्रीडाशिक्षक डॉ. प्रदीप तळवेलकर, क्रीडाशिक्षक प्रशांत जगताप, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक आसिफ खान अजमल खान, मारवड (ता. अमळनेर) येथील महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. देवदत्त पाटील, धंतोली (नागपूर) येथील प्राचार्य बी. पी. खिंवसरा, नाशिक येथील निवृत्त क्रीडाशिक्षक तथा शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडा संघटक अशोक दुधारे, औरंगाबाद येथील क्रीडा संघटक तथा क्रीडा संचालक डॉ. उदय डोंगरे, नागपूर येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. पाटील, इंदूर येथील सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव डॉ. एल. आर. मोर्य. या नऊ जणांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.
शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित डॉ. प्रदीप तळवेलकर यांना त्वरित अटक करून त्यांच्याकडील सर्व मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे जप्त करून चौकशी करावी. ज्यांनी शासनाची फसवणूक करण्यासाठी डॉ. तळवेलकर यांच्याशी संगनमत करून खोटे प्रमाणपत्र तयार केले, त्या सर्वांना अटक करून त्वरित दोषारोपपत्र सादर करावे, अशी विनंती पोलिसांकडे केली आहे, अशी माहिती तक्रारदार फारुक शेख अब्दुला यांनी दिली आहे.