नाशिक : कुत्र्याला अमानुषपणे मारणाऱ्या संशयिताविरूध्द प्राणीप्रेमी संघटनेने तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
सात दिवसांपूर्वी सातपूर येथे एका व्यक्तीने कुत्र्याला गाडीला बांधत फरफटत नेल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. तसाच प्रकार मंगळवारी सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथे घडला. संशयित माणिक घुगे याने कुत्र्याच्या गळ्याभोवती दोर बांधत तो दुचाकीला अडकविला. कुत्र्याला मारहाण करुन श्रमिक नगर ते फाशीचा डोंगर एवढे अंतर त्यास दुचाकीबरोबर फरफटत नेले. त्या ठिकाणी गेल्यावर त्याला मारून टाकले. हा सर्व प्रकार भ्रमणध्वनीत कैद झाला.
ही चित्रफित पशुप्रेमी तसेच पॉकेअर पशु संस्थेचे साहिल ठाकूर आणि त्यांच्या सहकारी मुक्ता ठाकूर यांच्या हाती येताच संशयिताचा सातपूर पोलीसांच्या मदतीने शोध घेण्यात आला. त्यावेळी संशयित माणिकने कुत्रा पिसाळला होता, त्याला रेबीज झाला होता, अशी कारणे पुढे करुन स्वत:ची सोडवणूक करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, पर्यावरणप्रेमी आक्रमक झाल्याने मंगळवारी रात्री उशीराने सातपूर पोलीस ठाण्यात संशयित माणिकविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
सात दिवसांपूर्वी सातपूर परिसरातून एकाने एक जण कुत्र्याला मारहाण करत फाशी देत असल्याचे सांगितले. त्याला कोणी प्रतिकार केला तर त्याच्यावर दगडफेक करत असल्याचे सांगितले. मंगळवारी त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली. संशयित माणिकचे कृत्य हे भ्रमणध्वनीत कैद झाले आहे. त्याला याविषयी विचारणा केली असता तो कांगावा करतो. माणिककडून कुत्रा पिसाळला होता, त्याला रेबीज झाला होता, अशी वेगवेगळी कारणे देण्यात आली.
प्रत्यक्षात तो कुत्र्याच्या जिवाशी खेळत होता. हा सर्व प्रकार क्रुरतेचा कळस गाठणारा आहे. त्याला शिक्षा व्हावी यासाठी प्राणीप्रेमी एकत्र झाले आहेत, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येणार आहे. मखमलाबाद येथेही एक कुटूंब बंगल्याच्या आवारात कुत्र्याला जबर मारहाण करत असल्याची माहिती मिळाली असून त्याविषयीही आवाज उठविण्यात येईल – शरण्या शेट्टी (प्राणीप्रेमी)