जळगाव – हनी ट्रॅप प्रकरणी जामनेर तालुक्यातील संशयित प्रफुल्ल लोढा विरोधात मुंबईत पोस्को कायद्यांतर्गत बलात्कार आणि हनी ट्रॅपसंबंधी दोन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, लोढा याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. हे प्रकरण केवळ अधिकाऱ्यांपुरते मर्यादित नसून काही मोठे राजकीय नेतेही त्यात अडकल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केला आहे.

पोस्को कायद्यांतर्गत बलात्कार आणि हनी ट्रॅपसंबंधी दोन गुन्हे पहूर येथील प्रफुल्ल लोढा विरोधात दाखल झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका चांगलाच चर्चेत आला आहे. संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास मुंबई पोलीस करत असताना, जळगावच्या पोलीस अधीक्षकांनाही त्याबद्दल काहीच माहिती देण्यात आलेली नाही. संशयित लोढा याच्या मालमत्तेची झाडाझडती घेण्यासाठी तेवढी स्थानिक जामनेर पोलिसांची मदत घेण्यात आली.

लोढाच्या मालमत्तेची झडती घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, कुटुंबातील सदस्यांचे भ्रमणध्वनी आणि इतर महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे यापूर्वीच जप्त केली आहेत. त्यातून पोलिसांना हनी ट्रॅप प्रकरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढा आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे पूर्वापर घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप करून या प्रकरणात उडी घेतली आहे.

संशयित प्रफुल्ल लोढा याच्याकडे अजुनही काही महत्त्वाचे पुरावे आहेत. आणि त्यात कोण कोण राजकीय व्यक्ती सहभागी आहेत, याबाबतचा सखोल तपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शकपणे करावा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. प्रफुल लोढा हा पूर्वी एक सामान्य कार्यकर्ता होता; मात्र, अलिकडील काही वर्षात तो अचानक कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक कसा झाला, याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे खडसे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्री गिरीश महाजन यांच्याशी प्रफुल्ल लोढा याचे पूर्वी खूप सख्य होते. परंतु, नंतर त्यांचे दोघांचे संबंध बिघडले. लोढा याने महाजन यांच्यावर मागे काही दिवसांपूर्वी अनेक गंभीर आरोप केले होते. याशिवाय भाजपला सोडचिठ्ठी सुद्धा दिली होती. कालांतराने मंत्री महाजन यांच्याशी बिघडलेले संबंध सुधारल्याने लोढा यास पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. अनेक कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या लोढाला भाजपमध्ये पुन्हा प्रवेश कसा मिळाला. याबाबतीतही खुलासा झाला पाहिजे, असेही खडसे यांनी म्हटले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याचे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.