जळगाव : वडिलोपार्जित शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील जुन्या कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी सुमारे २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी चाळीसगाव तहसील कार्यालयातील महिला तलाठी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
तक्रारदार व त्यांच्या इतर सात भावंडांच्या नावे असलेल्या वडिलोपार्जित शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर जुन्या कालबाह्य नोंदी होत्या. त्या नोंदी कमी करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी अर्ज केला होता. तलाठी मोमीन दिलशाद अब्दुल रहिम (२९, रा. चाळीसगाव) यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अर्ज जमा करून घेतला. परंतु, अर्ज मिळाल्याची पोचपावती दिली नाही. त्यानंतर पाठपुरावा केल्यावर तलाठी मोमीन दिलशाद यांनी तक्रारदारांना तुमचे काम खूप मोठे आहे. मी तुमच्या गावातील ग्रामरोजगार सेवक वाडीलाल पवार याच्याकडे पैशांबद्दल सांगते. तुम्ही त्यांना भेटून घ्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे दिल्यावर मी तुमचे काम करून देते. त्याशिवाय तुमचे काम होणार नसल्याचे सांगून तक्रारदाराची अडवणूक केली.
त्यानुसार तक्रारदाराने महिला तलाठीने सांगितल्याप्रमाणे संबंधित व्यक्तीशी संपर्क साधल्यावर त्याने सुमारे २५ हजार रूपयांची मागणी केली. अखेर तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला त्याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पथकाने सापळा रचून महिला तलाठीसह रोजगार सेवक वाडीलाल पवार आणि मध्यस्थी दादा जाधव यांना २५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना तहसील कार्यालयाबाहेर रंगेहात पकडले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तिन्ही संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, यशवंत बोरसे आणि त्यांच्या पथकाने सदरची कारवाई यशस्वी केली.
गेल्याच आठवड्यात जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कागदपत्रांच्या नकला देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रशांत ठाकूर आणि संजय दलाल हे दोघे महसूल सहाय्यक जाळ्यात अडकले होते. दुसऱ्या प्रकरणात जिल्हा परिषदेतील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी सुनील भागवत यांनाही तक्रारदाराकडून पाच हजार रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. दोन्ही प्रकरणांमुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमधील लाचखोरी चांगलीच चव्हाट्यावर आली होती. त्यानंतर आता पुन्हा चाळीसगाव तहसील कार्यालयातील महिला तलाठी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.