नाशिक : वारकऱ्यांमध्ये विशेष महत्व असलेली संत निवृत्तीनाथ यात्रा अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना अपूर्ण बांधकामामुळे देवस्थानच्या नियोजनात अडथळे येत आहेत. यात्रा सुरू होण्यापूर्वीच संत निवृत्तीनाथ मंदिर परिसरात कृत्रीम सभामंडप, दर्शनबारीची उभारणी करण्यात येणार आहे. यंदाची वारी निर्मलवारी व्हावी यासाठी प्रशासनासह देवस्थान प्रयत्न करत आहे.

संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानच्या वतीने यात्रेचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. १६ ते २० जानेवारी या कालावधीत यात्रा भरणार आहे. सध्या मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम सुरू आहे. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या प्रसाद योजने अंतर्गत ही कामे सुरू आहेत. यात्रा काळात राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी त्र्यंबक नगरीत दाखल होतात. त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थानच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. मंदिर परिसरातील मुख्य सभागृह, सभामंडप पाडण्यात आले आहे. या ठिकाणी कृत्रीम सभामंडप तयार करण्यात येणार आहे. हे काम गुरुवारपासून सुरु करण्यात आले. मुख्य मंदिरासमोर सभामंडप तयार करुन दर्शनबारीची व्यवस्था करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> नाशिक : त्र्यंबक देवस्थान शुक्रवारपासून दर्शनासाठी खुले

वारकऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी दर्शनबारीवरही मंडप राहील. उत्सव काळात देवस्थान परिसराला आकर्षक सजावट करण्यात येणार असून लाल गालिचाचा वापर करण्यात येणार आहे. याविषयी देवस्थानचे अध्यक्ष निलेश गाढवे पाटील यांनी माहिती दिली. यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मानाच्या दिंड्या येतात. त्या मानकरींचे सभामंडपात स्वागत करत त्यांच्या निवासासाठी राहुट्या उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वारकऱ्यांच्या आरोग्यास बाधा येऊ नये यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> नाशिक पदवीधरची निवडणूक राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवाराविना; २९ उमेदवारांचे ४४ अर्ज दाखल

पायी येणारे वारकरी, दिंड्या यांना वाहनाची धडक बसून अपघात होत असतात. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने त्र्यंबककडे येणाऱ्या बससाठी वेग मर्यादा ठरवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय निर्मल वारीसाठी फिरते शौचालय, शुध्द पाणी, कुशावर्त कुंडाची स्वच्छता आदींची मागणी करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संत श्री निवृत्तीनाथ यात्रा निर्मल वारीसारखी व्हावी, यासाठी देवस्थानच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाकडून उत्सव काळात गर्दी होऊ नये यासाठी दुभाजक मागून मंदिर परिसर बंदिस्त करण्यात येणार आहे. १५०० फिरती स्वच्छतागृहे, स्वतंत्र आरोग्य व्यवस्था, स्वच्छ पाणी, सर्व घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी देवस्थानचे ३० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आदी व्यवस्था करण्यात आली आहे. मानाच्या दिंड्यासाठी राहुट्यांची व्यवस्था करण्यात येणार असून श्रीफळ, प्रसाद देऊन त्यांचे स्वागत करण्यात येईल.