लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: अल्पदरात विमान तिकीट काढून देण्याच्या नावाखाली एकाने १० जणांना पावणेसात लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. रशियात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शहरातील १० विद्यार्थ्यांना सुट्टीत घरी परतण्यासाठी पालकांमार्फत हे तिकीट एकत्रितपणे काढले जात होते. त्यात ही फसवणूक झाली. अल्प दरातील विमान तिकीट न मिळाल्याने अखेर पालकांना आपल्या पाल्यांना देशात आणण्यासाठी पुन्हा नव्याने तिकीटे काढण्याचा भुर्दंड सहन करावा लागला.

आणखी वाचा-नाशिकरोडमध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याची वरात, मोक्कांतर्गत कारवाईचे निर्देश

याबाबत दिनेश खैरनार (आनंदनगर, पाथर्डी फाटा) यांनी तक्रार दिली. खैरनार यांच्या मुलासह शहरातील १० विद्यार्थी रशियातील किरगिस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. मे महिन्यात सुट्टी लागणार असल्याने ते देशात परतणार होते. त्यांच्या विमान तिकीटासाठी खैरनार आणि उर्वरीत मुलांच्या पालकांनी संशयित प्रतिक पगार (मोरे मळा, हनुमानवाडी) याच्याशी संपर्क साधला. संशयिताने मुलांचे भारतात परतीचे विमान तिकीट कमी दरात काढून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे सर्व पालकांनी सहा लाख ८६ हजार रुपये संशयिताकडे दिले होते. परंतु, सुट्टी संपूनही संशयिताने तिकीटांची व्यवस्था केली नाही. तीन महिने उलटूनही तिकीट अथवा पैसे परत न केल्याने खैरनार यांनी पगारकडे संपर्क साधला. तेव्हा संशयिताने शिवीगाळ करीत दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी संशयित पगारविरुध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सी. राजपूत करीत आहेत. पालक आणि संशयित यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारांचे पुरावे संकलित केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

आणखी वाचा- नाशिकचा कांदा प्रथमच मणिपूरमध्ये दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या घटनाक्रमात पैसे देऊनही मुलांचे विमान प्रवासाचे तिकीट मिळाले नाही. त्यामुळे सुट्टीत मुलांना घरी येता यावे म्हणून पालकांना पुन्हा नव्याने विमान तिकीट काढावे लागले. त्या तिकीटाच्या आधारे मुले रशियातून भारतात परतली होती. यात पालकांना चांगलाच भुर्दंड सहन करावा लागला. यातील अनेक मुलांचे रशियात शिक्षणाचे पहिलेच वर्ष होते. त्यामुळे त्यांना हा प्रवास, तिकीटे याबाबत फारशी माहिती नव्हती, असे सांगितले जाते.