जळगाव – मुलाला मंत्रालयात किंवा रेल्वेत कनिष्ठ अभियंतापदावर नोकरी लावून देतो, असे सांगत विमा कंपनीतील व्यक्तीला सुमारे २२ लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिव कॉलनीतील रहिवासी प्रवीणचंद्र दिघोळे (५८, शिव कॉलनी, जळगाव) यांना चंद्रभान ओसवाल आणि त्याचा भाऊ अनिल ओसवाल (दोघे रा. धुळे) यांनी तुमच्या मुलाला मंत्रालयात नोकरी लावून देतो, असे २०१८ मध्ये सांगितले होते. १० मे २०१८ रोजी दोघे दिघोळे यांच्या घरी येऊन मंत्रालयात आमचे अधिकारी परिचयाचे असून, त्यासाठी २२ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. दिघोळे यांनी दोघांना नऊ लाख रुपये रोख दिले. २७ मे रोजी पुन्हा घरी बोलावून सात लाख रुपये दिले. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी चंद्रभान ओसवाल हा बनावट नियुक्तीपत्र घेवून दिघोळेंकडे गेला. तुमच्या मुलाचे काम झाले असून, १८ फेब्रुवारी २०२१ रोजी कामावर रुजू केले जाणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार दिघोळे मुंबईत गेले. मात्र, त्यांना कुणीही भेटले नाही. त्यानंतर दिघोळेंना ओसवालने तुम्हाला दुसरी नोकरी देतो, असे सांगत त्यानेच ओळख करून दिलेल्या हरताली प्रसाद रोहिदास याने दिघोळेंना मुलाला रेल्वेत कनिष्ठ अभियंतापदाचे नियुक्तीपत्र देण्याचे आमिष दाखवून सहा लाख रुपये मागितले. दिघोळेंनी हरतालीच्या बँक खात्यावर आठ ते ११ नोव्हेंबर २०२१ दरम्यान सहा लाख रुपये पाठविताच हरतालीने दिघोळेंच्या व्हॉट्सअ‍ॅपवर नियुक्तीपत्र पाठविले. मात्र त्यांना कुठलीही नोकरी लावून दिली नाही.

हेही वाचा – जळगाव : सप्तश्रृंग गडाकडे जाणाऱ्या दिंडीवर पाळधीत दगडफेक; तीनजण जखमी

हेही वाचा – नाशिक : सावरकर मुद्यावरून शिवसेनेकडून विनापरवानगी फलकबाजी; ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिघोळे यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या तक्रारीनुसार चंद्रभान ओसवाल, अनिल ओसवाल, हरताली प्रसाद रोहिदास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.