नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असताना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ योध्दे छगन भुजबळ यांना आजारपणामुळे डाॅक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्याने ते सध्यातरी थेट निवडणुकीच्या रणांगणात नाहीत. परंतु, त्यांच्या मार्गदर्शनानेच निवडणुकीची व्यूहरचना आखली जात आहे. येवल्याचा किल्ला राखण्याची जबाबदारी आता त्यांच्या शिलेदारांवर येऊन पडली आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अलीकडेच मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूट येथे हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. रमाकांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी पुढील काही दिवस छगन भुजबळ यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी त्यांना पुढील काही दिवस कोणालाही भेटता येणार नाही, अशा सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत. डाॅक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्याने छगन भुजबळ हे सध्या निवडणुकीच्या मैदानात प्रत्यक्ष दिसत नाहीत.

परंतु, त्यांची जागा भरुन काढण्यासाठी आणि येवल्यासह नांदगाव, मनमाड येथील गड लढविण्यासाठी छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ पुढे सरसावले आहेत. कोणाशी तह करायचा, कोणाशी थेट लढाई करायची, याविषयी छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाने समीर भुजबळ निर्णय घेत आहेत.

यासाठीज्येष्ठ नेते अंबादास बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, ज्येष्ठ नेते अरुण थोरात आदींची साथ मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी छगन भुजबळ यांच्या विचारांशी एकनिष्ठ असलेल्या आणि विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

समीर भुजबळ यांचे येवल्यासह नांदगाव आणि मनमाड या नगरपालिकांवर विशेष लक्ष आहे. निवडणुकांच्या अनुषंगाने विशेषतः युतीबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नसल्याने समीर भुजबळ यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन चर्चा केली. नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदा, महानगरपालिका यांच्या देखील निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, या निवडणुकांमधील युतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना पक्षनेतृत्वाकडून आपल्याला मिळाल्या असल्याचे समीर भुजबळ यांनी नमूद केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील येवला, लासलगाव, नांदगाव, मनमाड या परिसरात मार्गदर्शक छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आजवर मोठ्या प्रमाणात विकासकामे झालेली आहेत. तसेच येवला-लासलगाव मतदारसंघात अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. उमेदवारी देताना आपण प्रामुख्याने इच्छुकांचा जनसंपर्क, जनहिताची तळमळ, जनतेच्या गरजांची जाणीव, काम करण्याची व निवडून येण्याची क्षमता या गोष्टींना प्राधान्य देणार आहोत, याची माहिती गिरीश महाजन यांना दिली असल्याचे समीर भुजबळ यांनी नमूद केले आहे.