लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. प्रत्यक्ष मतदानालाही लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र, नाशिक लोकसभेच्या जागेबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. या जागेवरून महायुतीत संघर्षाची चिन्हे आहेत. अशातच आता नाशिकच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. नाशिकमधून मी उभं राहावं हे दिल्लीतून ठरलं असल्याचे ते म्हणाले. आज नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

हेही वाचा – अंबादास दानवेंच्या पक्षप्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ऑपरेशन …

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?

“नाशिकच्या जागेसाठी माझा आग्रह नव्हता. मात्र, ज्यावेळी महायुतीतील जागावाटपावर दिल्लीत चर्चा झाली, त्यावेळी अचानक माझं नाव पुढे आलं. नाशिकमधून छगन भुजबळांनी उभे राहावं दिल्लीत ठरले. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरदेखील मी चर्चा केली होती. तसेच फडणवीस यांनीही मला उभं राहण्यास सांगितले”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

“नाशिकच्या जागेसाठी माझं नाव अचानक नाव पुढे आल्याने मी काही लोकांबरोबरही चर्चा केली होती. खरं तर नाशिकच्या जागेवर विद्यमान खासदारांनी दावा केला आहे. त्यामुळे यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यामुळे जो निर्णय होईल, तो आम्हाला मान्य असेल”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – अजित पवारांनी केलेल्या सर्वेक्षणात सुप्रिया सुळे आघाडीवर; रोहित पवार म्हणाले, “सुप्रि…

मराठा आरक्षणाबाबतही दिली प्रतिक्रिया

माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबतही प्रतिक्रिया दिली. “मराठ्यांच्या आरक्षणाला मी कधीच विरोध केला नाही. त्यांना आरक्षण मिळावं हीच आमची भूमिका आहे. मात्र, मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, असे आमचे म्हणणे आहे”, असे ते म्हणाले.

दरम्यान, नाशिकमध्ये छगन भुजबळ हे मराठा आरक्षण विरोधी असल्याचे फलक लावण्यात आले होते. यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. “लोकशाहीत अशा प्रकारचे फलक लावणे चुकीचे आहे. माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही, असे मी यापूर्वी मी सांगितले आहे. खरं तरं असा विरोध मलाच नाही, तर पंकजा मुंडे आणि प्रणिती शिंदे यांनाही होतो आहे. त्यांच्या गाड्या अडवल्या जात आहेत. त्यांच्या गांवबंदीचे फलक लावणे सुरू आहे, त्यांनी कधीची मराठा विरोधी भूमिका घेतलेली नाही, मग त्यांना विरोध का होतो आहे?” असेही ते म्हणाले. तसेच ओबीसी आणि दलित समाजाने निवडणूक लढवायची नाही का? असा प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केला.