नाशिक : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी येवला तालुक्याचा कृषी माल केवळ राज्यातच नव्हे तर, देशाच्या विविध भागात पोहोचावा, यासाठीही चाललेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, बाजार समितीच्या सभापती सविता पवार, उपसभापती संध्या पगारे यांच्यासह सभासद, नागरिक व शेतकरी उपस्थित होते. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर मदत उपलब्ध होणार आहे. शेती क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. शेतमालाची गुणवत्ता, साठवण, वाहतूक आणि विपणन या सगळ्या गोष्टींमध्ये नव्या तंत्रज्ञानाची आणि सुविधा विकासाची गरज आहे. या बाबी लक्षात घेऊन येवला बाजार समितीत शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
येवला बाजार समितीत शेतकरी भवन निर्माण करण्यासाठी दीड कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. या बाबतचा प्रस्ताव बाजार समितीने तातडीने सादर करावा. यासोबत कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी चिचोंडी औद्योगिक वसाहतीत ५० एकर जागेवर प्रकल्प उभारण्यात येत असल्याचे मंत्री भुजबळ यांनी नमूद केले. बाजार समितीचा डोंगरगाव येथे उपबाजार सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक ती जमीन दिली गेली. त्यामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांना आता दुरचा प्रवास करावा लागणार नाही. अंदरसूल उपबाजारात कांदा लिलाव स्थळाचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. पावसाळ्यात शेतमाल भिजू नये म्हणून निवारा शेडची कामे देखील सुरु आहेत.
येवला तालुक्याचा कृषी माल केवळ राज्यातच नव्हे तर, देशाच्या विविध भागात पोहोचावा, यासाठीही प्रयत्न सुरु आहे. त्याकरिता येवला आणि नगरसूल रेल्वे स्थानकात “गुड्स शेड” उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. कृषी माल वाहतूक करणाऱ्या रेल्वेला येवला स्थानकात अधिक बोग्या जोडून गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी देखील रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. शेतमाल साठवणुकीसाठी पणन विभागाच्या माध्यमातून मोठ्या गोदामांची उभारणी केली जात असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले. येवला तालुक्यातील व्यापारी प्रतिनिधींची त्यांनी नंतर बैठक घेतली.