जळगाव – राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अर्ध्या तासापेक्षाही अधिक वेळ चर्चा झाली. दोघांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असताना, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ‘आम्ही राजकारणी एकमेकांचे विरोधक आहोत शत्रू नाही’, असे भाष्य करत दोघांच्या भेटीचे समर्थन केले.

 जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर अनेक तर्क-वितर्क लावले जात असतानाच आता त्यासंदर्भात छगन भुजबळ यांनी जळगाव येथे प्रतिक्रिया दिली आहे. असे प्रकार नेहमीच होत असतात. पक्षांतर्गत चर्चा ही आवश्यक असते. दोन नेते भेटले म्हणून त्यातून काही वेगळे अर्थ काढणे योग्य नाही. आपण सर्वजण एकाच परिवाराचे भाग आहोत. काही मुद्द्यांवर चर्चा व्हावी लागतेच, त्यामुळे या भेटीत काही विशेष असे काही नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. जळगावमध्ये समता परिषदेतर्फे आयोजित ओबीसी मेळाव्यासाठी आल्यानंतर भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

औरंगजेबच्या कबरीवरून नागपूरमध्ये उसळलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंसक घटना घडल्या. जाळपोळ, दगडफेक झाली. काही पोलीसही जखमी झाले. या प्रकरणाविषयी भुजबळ यांनी, पोलीस आपले कर्तव्य बजावत असून जो कोणी चुकीचा वागला असेल त्याच्यावर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. सरकार आणि पोलीस यंत्रणा पूर्ण तयारीत आहेत. सक्तीची कारवाई होईल याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनीही विधानसभेत दिली आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांनाही टोला हाणला. जर कोरटकर वर्षावर असतील, तर संजय राऊत यांनी तेथे जाऊन कोरटकरांना घेऊन यावे, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या विषयावर  चिंता व्यक्त करून भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला.