नाशिक – नाशिक विमानतळासभोवतालच्या क्षेत्रात ‘एअर पोर्ट फनेल’च्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे, असे निर्देश राज्याचे अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिले. जिल्हाधिकारी आणि हवाई नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी या क्षेत्रातील इमारती व बांधकामांचे संयुक्तपणे सर्वेक्षण करावे, असे त्यांनी सूचित केले.
जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत भुजबळांनी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनिषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा केली. यात नाशिक विमानतळावरील ‘एअर पोर्ट फनेल’चाही विषय होता. मध्यंतरी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) प्रशासनास पत्र दिल्याचे सांगितले जाते. एअरपोर्ट फनेलच्या नियमावलीनुसार संबंधित क्षेत्रात बांधकामे व विकास कामांना निर्बंध घालण्याचे सूचित केले आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, विमानांच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा पुढे आला आहे. कुंभमेळ्याआधी नाशिक विमानतळावर अतिरिक्त नवीन धावपट्टी बांधण्यात येणार आहे. विमानतळाच्या परिसरात एअरपोर्ट फनेलच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणीची आवश्यकता भुजबळ यांनी मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष विमानतळ परिसरात भेट द्यावी. हवाई नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या सोबतीने या क्षेत्रातील इमारती व बांधकामांचे सर्वेक्षण करावे. त्यांची उंची किती आहे याचे अवलोकन करावे, असे सूचित करण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले. या क्षेत्रात विहित निकषापेक्षा कमी उंचीच्या बांधकामांना परवानगी देणे योग्य असेल यावर त्यांनी भर दिला.
द्वारका आणि मुंबई नाका परिसरातील वाहतूक कोडींच्या प्रश्नात आपण लक्ष घालणार आहोत. रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत ठेवणे हे यंत्रणांचे काम आहे. महापालिकेने स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत केल्यास रोगराईचे प्रमाण कमी होईल. द्वारका चौकात वाहतुकीचा अभ्यास करून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी लागणार आहे. वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी द्यावा लागणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. कर्जमाफीच्या प्रश्नावर त्यांनी आर्थिक बाबीशी संबंधित विषयांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतले जातात असे नमूद केले.
पालकमंत्रीपदासाठी इच्छुक नाही, पण…
आपण पालकमंत्रीपदासाठी इच्छुक नाही. नाशिक जिल्ह्या्साठी जे काही काम करायचे आहे, त्यासाठी मंत्री असो, आमदार असो वा नसो. प्रयत्न करीत राहणार असल्याचे मंत्री भुजबळ यांनी नमूद केेले. पालकमंत्रीपदावरून महायुतीत संघर्ष सुरू आहे. शहरवासीयांना भेडसावणाऱ्या प्रश्नात भुजबळ यांनी लक्ष घालून यंत्रणांना सुनावल्याचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहे. नाशिकला पालकमंत्री नसल्याने कुंभमेळ्याची कामे रखडली का या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री स्वत: या कामांकडे लक्ष देत असल्याचे स्पष्ट केले.