नाशिक: येवला शहरातील काही भागात गटारी तुंबल्या असून त्यांचे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांना घरात राहणे अवघड झाले आहे. मुले आजाराने त्रासले असून गटारींची स्वच्छता करून हा प्रश्न त्वरित न सोडवल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपच्या येवला-लासलगाव मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख अमृता पवार यांनी येवला नगरपालिकेला निवेदनाद्वारे दिला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा हा मतदारसंघ आहे. या समस्यांकडे लक्ष वेधत भाजप पदाधिकाऱ्याने भुजबळांच्या मतदारसंघातील चित्र मांडले आहे.

येवला शहरातील लक्कडकोट गल्लीतील सफाईबाबतचे निवेदन अमृता पवार यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले. लक्कडकोट गल्लीतील भूमिगत गटारी तुंबल्या आहेत. सांडपाणी रस्त्यांवरून वाहत आहे. नगरपालिकेकडे वारंवार स्वच्छतेची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. सांडपाण्यामुळे परिसरात आजार बळावत आहेत. त्यात कोणाचा मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी नगरपालिकेची राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा… नाशिकमधील निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप कोरडेठाक; धास्तीमुळे मागणी वाढून कृत्रिम टंचाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गटार स्वच्छतेबाबत कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही पवार यांनी दिला आहे. दरम्यान, पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी अमृता पवार या सध्या भाजपमध्ये आहेत. भुजबळ यांच्या मतदारसंघातील नागरी समस्यांकडे लक्ष वेधत एकप्रकारे त्यांच्याकडून भुजबळांना आव्हान दिले जात आहे. राष्ट्रवादीत असतानाही पवार आणि भुजबळ यांच्यात सख्य नव्हते. मराठा-ओबीसी वादाची किनारही त्याला आहे. येवल्यातील समस्या मांडण्यामागे भुजबळांची अप्रत्यक्षपणे कोंडी करण्याची खेळी खेळली जात असल्याची चर्चा आहे.