नाशिक: शिवसेना ठाकरे गटाने नाशिक लोकसभेच्या जागेवर राजाभाऊ वाजे यांची उमेदवार जाहीर करुन आघाडी घेतली असताना दुसरीकडे महायुतीत आपली हक्काची जागा मित्रपक्षांकडून हिरावली जात असल्याच्या भावनेतून शिंदे गटाचे पदाधिकारी बुधवारी रात्री पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसमोर शक्ती प्रदर्शन करण्यासाठी मुंबईत दाखल झाले. उत्तर महाराष्ट्रात शिंदे गटाकडे नाशिकची एकमेव जागा आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ही जागा राष्ट्रवादी वा भाजपला दिली जाऊ नये, असा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरला जाणार असल्याचे नेत्यांकडून सांगण्यात आले.

भाजपला साताऱ्याची जागा देण्याच्या मोबदल्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाने नाशिकची जागा मागितली आहे. काही मतदारसंघात अदलाबदल होऊ शकते, असे संकेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिले होते. नाशिकच्या जागेवर स्वत: भुजबळ हेच इच्छुक असल्याचे सांगितले जाते. भाजपही नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहे. भाजप, राष्ट्रवादीचे दावे आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे वादात सापडलेल्या नाशिकच्या जागेवर शक्य तितक्या लवकर आपला उमेदवार जाहीर करावा, यासाठी रविवारी रात्री शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे येथे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या देत शक्ती प्रदर्शन केले होते. त्यानंतर भाजपच्या लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शिवसेनेची मतदारसंघात ताकद नसल्याचे दावे केले होते. मित्रपक्षांनी हा मतदारसंघ खेचून घेण्याची जय्यत तयारी चालविली असताना बुधवारी शिवसेना ठाकरे गटाने या मतदार संघात राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर केले. शालिमार येथील शिवसेना कार्यालयात वाजे यांचा सत्कार करुन पदाधिकाऱ्यांनी प्रचाराच्या नियोजनावर चर्चा केली. नाराज विजय करंजकर यांची पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी भेट घडवून समजूत काढली जाईल, असे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>>आम्ही नवरदेववाले, तुम्ही नवरीवाले…;पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भाजपला टोला

दुसरीकडे, महायुतीत छगन भुजबळ यांना नाशिकची जागा सुटल्याची चर्चा सुरु झाल्याने शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, खासदार हेमंत गोडसे आणि सर्व पदाधिकारी दुपारी पुन्हा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले. पालकमंत्री दादा भुसे हे देखील थेट मुंबईत सहभागी होणार आहेत. उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेकडे असणारी ही एकमेव जागा आहे. त्यामुळे कुठल्याही स्थितीत ती शिवसेनेला मिळायला हवी, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख बोरस्ते यांनी सांगितले. आधी भाजप व आता राष्ट्रवादी या जागेवर दावा सांगत आहेत. त्यामुळे शिवसेनेने लवकरात लवकर आपला उमेदवार जाहीर करावा, अशी पदाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे.

‘वर्षा’वर शक्ती प्रदर्शन ?

नाशिकच्या जागेवरून भाजप-शिवसेनेत बिनसले असून उभयतांकडून परस्परांना लक्ष्य करण्यात येत आहे. दोघांच्या संघर्षात राष्ट्रवादी अजित पवार गटाने उडी घेत जागा स्वत:कडे घेण्याचे नियोजन सुरु केल्याचे सांगितले जाते. त्यास विरोध करण्यासाठी शिंदे गटाचे पदाधिकारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मुंबईतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या बंगल्यावर दाखल झाल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.