नाशिक : जिल्हा न्यायालयाच्या सात मजली देखण्या व आधुनिक इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या इमारतीतील सुविधांची पाहणी केली. इमारतीतील व्यवस्थेने त्यांना सुखद धक्का बसला. युद्धपातळीवर या अलिशान इमारतीचे काम करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, इमारतीचे वास्तूविशारद, रचनाकार व बांधकाम कंत्राटदार आणि या कामात गुंतलेल्या सर्वांचे त्यांनी मनांपासून कौतुक केले. या इमारतीतील न्यायाधिशांचे दालन पाहून ते आश्चर्यचकीत झाले.
शनिवारी नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन आणि वाहनतळ इमारतीचे भूमिपूजन सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते झाले. त्यांनी या इमारतीची पाहणी केली. इमारतीत न्यायालयीन सभागृह, कार्यालय, सरकारी अभियोक्ता कक्ष, ग्रंथालय, संगणक सर्व्हर कक्ष, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग खोली, हिरकणी कक्ष, बँक एटीएम, टपाल कार्यालय आदींचा समावेश आहे. उच्च न्यायालय वा एकाही जिल्हा न्यायालयात नसलेले ‘एस्केलेटर’ (सरकता जिना) आहे. सुमारे चार लाख चौरस फुटाचे बांधकाम असणाऱ्या पर्यावरणस्नेही इमारतीत अद्ययावत सोयी सुविधांकडे लक्ष देण्यात आले. विविध प्रकारची शिल्पे, चित्र आणि वारली चित्रकलेचे दर्शन घडते. त्याच्याशी अनुरुप प्रकाश योजनेची सांगड घातली गेल्याने अंतर्गत भागास वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे.
नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे सरन्यायाधीश गवई यांनी कौतुक केले. देशात महाराष्ट्रातील न्यायालयांच्या पायाभूत सुविधांविषयी चर्चा होते. परंतु, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा निश्चितपणे चांगल्या आहेत. देशातील सर्व जिल्हा न्यायालय इमारतींमध्ये नाशिकची ही इमारत अतिशय सुंदर असल्याचे त्यांनी नमूद केले. न्यायालये ही न्यायाधीश यांच्यासोबतच पक्षकार आणि वकिलांची आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी येथे सुविधा निर्माण केल्या गेल्याचे प्रशस्तीपत्रक त्यांनी दिले.
कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात, मात्र, नाशिकमधील ही सुंदर इमारत प्रत्येकाने नक्की पाहिली पाहिजे, अशा शब्दांत सरन्यायाधीश गवई यांनी इमारत बांधकामाचे कौतुक केले. इमारतीतील न्यायाधिशांचे दालन, फर्निचर व आदी व्यवस्था पाहून सुखद अनुभूती मिळाली. सध्याच्या न्यायालयाच्या ब्रिटीशकालीन इमारतीच्या पाठीमागील बाजूला ही इमारत आहे. नवीन इमारत आणि पुढील बाजूला वारसा वास्तू यांचा कल्पकतेने मिलाफ घालण्यात आल्याचे गवई यांनी नमूद केले्. इमारतीच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांच्यासह अन्य अधिकारी, वास्तूविशारद, कंत्राटदार आदींचा न्या. गवई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.