नाशिक : संविधानाने दिलेल्या अधिकार, शिकवणीमुळे साध्या गावातील एक मुलगा आज सरन्यायाधीशपदी काम करीत आहे. श्रध्दा आणि झोकून देत काम करण्याची तयारी असली तर अशक्य काहीही नाही. अमरावती येथील पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉनंतर देशातील नाशिकचे दुसरे विधी महाविद्यालय आहे, ज्या ठिकाणी मी आलो. मी नोव्हेंबरमध्ये पुन्हा येईन, असे आश्वासन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिले.

येथील न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयात सरन्यायाधीश गवई यांनी शनिवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त महाविद्यालयात संविधानातील उद्देशिका फलकाचे अनावर सोहळ्याचे आयोजन न्या. गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. कार्यक्रमास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यासह संस्थेच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे, न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य एच. आर. कादरी आदी उपस्थित होते.

यावेळी न्या. गवई यांच्या हस्ते संविधानातील उद्देशिका फलकाचे अनावरण, विधी संशोधन केंद्र, दोन नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन आणि विधीविशेष मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. न्या. गवई यांनी मार्गदर्शन केले. जिद्द आणि काम, अभ्यास याविषयी श्रध्दा असेल तर संधी आपोआप मिळते. संविधानाने ही संधी आपणास दिल्याने अमरावतीमधील एका लहानश्या खेड्यातून सरन्यायाधीशपदापर्यंतचा प्रवास शक्य झाल्याचे नमूद केले. न्यायमूर्तींनी न्यायदान जलदगतीने केले तरच लाेकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिल. विद्यार्थ्यांनी विधी क्षेत्राची प्रतिमा मलीन होईल असे कुठलेही काम करू नये, असे आवाहन करतांना न्या. गवई यांनी विद्यार्थ्यांना शपथ घेण्यास सांगितले.

पूर्वनियोजित कार्यक्रमास उशीर

शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हा कार्यक्रम उशीरा सुरू झाल्याने न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयामधील कार्यक्रमासही उशीर झाला. गुरूदक्षिणा सभागृहात विद्यार्थ्यांना न्या. गवई यांची तीन तास प्रतिक्षा करावी लागली. न्या. गवई आल्यावर कार्यक्रम पाऊण तासात आटोपला.