नाशिक : कुंभमेळ्यातील अमृतस्नान लाखो वर्षांपासून चालू आहे. पालकमंत्री येतात, जातात. त्यांचा काय संबंध, नाशिकला पालकमंत्री नसल्यामुळे काही अडले आहे का, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी येथे साधू-महंतांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या प्रश्नावर त्यांनी कुंभमेळ्यात अमृतस्नान होेते. ते अत्यंत महत्वाचे आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन काम पाहत आहेत. दादा भुसे, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ आदी मंत्री बरोबर आहेतच. काही कमी पडल्यास आम्ही आहोत. कुंभमेळ्यात राजकारण आणू नका. आपले हे धार्मिक व सांस्कृतिक पर्व असल्याचे फडणवीस यांनी सूचित केले.
साधुग्रामसाठी जागा अधिग्रहण अंतिम टप्प्यात
त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी जागा कमी असल्याने त्याठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून गोदावरी घाटावर पर्यायी व्यवस्था करण्याच्या प्रस्तावावर साधू-महंतांचे एकमत झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिक येथे साधुग्रामसाठी आरक्षित जागेच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या निमित्ताने पायाभूत सुविधांच्या कामांसाठी चार हजार कोटींच्या निविदा काढल्या गेल्या आहेत. आणखी दोन हजार कोटींच्या कामाच्या निविदा लवकरच काढल्या जातील.
कुंभमेळ्यात प्रामुख्याने गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केंद्रांची (एसटीपी) उभारणी करण्यात येणार आहे. साधू-महंतांनी केलेल्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून त्र्यंबकेश्वर-नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा भव्यदिव्य स्वरुपात होईल, असे नियोजन केले जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.