नाशिक : इगतपुरी तालुक्यात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह रोखण्यात बाल आयोगाला यश आले. आतापर्यंत जिल्ह्यात वर्षभरात १० बालविवाह रोखण्यात आले आहेत. प्रशासकीय पातळीवर बालविवाह रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथे १६ वर्षाच्या मुलीचा विवाह रायगड नगरातील एका युवकाशी होणार होता. याची माहिती मिळाल्यानंतर एल्गार सामाजिक संघटनेचे भगवान मधे यांनी बाल आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत आयोगाकडून शहानिशा करण्यात आली असता तक्रारीत तथ्य आढळून आले.

याविषयी बाल आयोगाच्या सायली पालखेडकर यांनी, माहितीची खातरजमा केली असता मुलगी अल्पवयीन म्हणजे नववीत शिकत असल्याचे सांगितले. पालकांकडून वेळेवर लग्नाचे स्थळ बदलण्यात आले. बाल आयोगाकडून मुलीचे आणि तिच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. आपली चूक लक्षात येताच त्यांनी बालविवाह थांबवत असल्याचे मान्य केले.
आतापर्यंत इगतपुरी तालुक्यात चार तर जिल्ह्यात १० बालविवाह रोखले गेले आहेत. यासाठी स्थानिक पातळीवर आशा, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील सर्वजण एकत्रित काम करत आहेत.

हेही वाचा…मविआ नेत्यांच्या छायाचित्रांचा वापर, जे. पी. गावितांविरोधात तक्रारीची शरद पवार गटाकडून तयारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ग्रामीण भागात कायद्याविषयी असणारे अज्ञान, गरीबी, मुलाकडून टाकण्यात येणारा दबाव यामुळे बालविवाह होत असल्याचे सांगितले जाते. बालविवाह केल्यास पालकांना कशाप्रकारे शिक्षा होऊ शकते, कमी वयात विवाह केल्याने मुलीला भविष्यात कोणत्या आरोग्यविषयक समस्यांना त्रास द्यावा लागू शकतो, याविषयी अधिक मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज असल्याचे निष्पन्न होत आहे. यासाठी सामाजिक संस्था, संघटना, युवावर्ग यांची मदत घेता येऊ शकते, असाही मतप्रवाह आहे