व्यवस्थापनापुढे खर्च भागविण्याचे आव्हान
सर्कसमधून गायब झालेले वन्यप्राणी, समाज माध्यमांत रममाण असणारा घटक आदी कारणांमुळे सर्कस पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमालीची घटली आहे. उन्हाळी सुटीच्या काळात शहरात दाखल झालेल्या गोल्डन सर्कसमध्ये याच कारणामुळे शहरवासीयांनी त्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. त्यामुळे व्यवस्थापनापुढे खर्च भागविण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
वर्तुळाकार तंबुत साधारणत ५० ते ६० फूट उंचीवर चालणारा झोक्यांचा खेळ.. मानवी शरीर आहे की, बाहुली इतक्या लवचिकतेने वाकणारे कलावंत.. हत्तीचा क्रिकेटचा सामना. विदुषकांची चाललेली जुगलबंदी.. आणि साहसी खेळांत कलावंतांनी जीवाची लावलेली बाजी.. ही वास्तवता सर्कशीच्या रिंगणात दिसत असते. परंतु असे असतानाही प्रेक्षक या सर्कशीकडे पाठ फिरवित असल्याचे दिसत आहे. वन्यप्राण्यांची कमतरता भरून काढण्यासाठी सर्कस व्यवस्थापनाने विविध नाविण्यपूर्ण संकल्पना समाविष्ट करत धडपड केली. परंतु, तरीही त्याकडे बहुतेकांनी पाठ फिरविल्याने हा व्यवसाय आणि त्यावर अवलंबून कलावंतांची रोजीरोटी अडचणीत आली आहे.
उन्हाळी सुटीचा कालावधी लक्षात घेऊन मुंबई नाका परिसरातील मैदानात गोल्डन सर्कसने डेरा टाकला आहे. आकर्षक, चित्तथरारक, करमणूक या त्रिसुत्रीवर भर देत ३० ते ३२ खेळांची आखणी करण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या सोयीनुसार दिवसातून तीन प्रयोग ठेवण्यात आले आहेत. या खेळांसाठी उत्तर प्रदेश, मणीपूर, मंगोलियन यासह अन्य ठिकाणाहून काही कलाकारांसह रशियन, अमेरिकन कलावंतांना सोबत घेत सर्कसमध्ये वेगवेगळे जिम्नॅस्टिकचे खेळ दाखविले जात आहेत. दूरचित्र वाहिन्यांवरील रोडीज शो, खतरो का खिलाडी यांसारख्या अन्य काही कार्यक्रमांमुळे या खेळांसाठी कलाकारांना आपला जीव पणाला लावावा लागत आहे.
तोडांतून आग बाहेर काढणे, आगीमधून चित्तथरारक कसरती, ३२ किलो वजनापासून ७२ किलो वजनापर्यंत लोखंडी गोळे दातात दोरी पकडत ओढणे, एका हातात गोळा उचलणे अशा करामती कलाकार करीत आहेत. यासाठी परदेशी कलावंतांना स्थानिकांच्या तुलनेत जादा मानधन द्यावे लागत असल्याचे सर्कसचे व्यवस्थापक सुंदर करात यांनी सांगितले. इतका सारा खटाटोप करूनही प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद सर्कसला मिळत नाही.
काही सरकारी निर्णय तसेच वन्यप्रेमींच्या विरोधामुळे सर्कस मध्ये वन्यप्राण्यांच्या वावरावर बंदी आल्याने सर्कसमध्ये केवळ हत्ती, घोडा, वेगवेगळे पक्षी, कुत्रा यांच्यावर ही कसरत पुढे नेण्याची वेळ आली आहे. वाघ-सिंह सर्कसमध्ये नसल्याने बच्चे कंपनीसह पालकांनी या खेळांकडे पाठ फिरविली आहे.
दिवसागणिक प्रेक्षकांची संख्या कमी होत असतांना दिवसभरासाठी ५५ ते ६० हजाराचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न सर्कल व्यवस्थापनासमोर आहे. त्यात मैदानाचे भाडे, कलाकारांचे मानधन, राहण्यासह जेवणाचा खर्च, वीज देयक, हत्तीसह इतर प्राण्यांचे पालन पोषण आदींवर मोठा खर्च करावा लागतो.
कलाकार मंडळी कुटूंबकबिला घेऊन आल्याने त्यांचाही प्रतिसादाअभावी भ्रमनिरास होत आहे. ही स्थिती कायम राहिल्यास ही कला नामशेष होईल, अशी भीती करात यांनी व्यक्त केली.