नाशिक : कुंभनगरी नाशिकमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्ताने फोफावलेली गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना नाशिकच्या नागरिकांकडून पुरेपूर पाठिंबा मिळत आहे. गुंडांना चोप देण्यात येत असल्याने सर्वसामान्य पोलिसांनाही नाशिकमध्ये सन्मान मिळू लागला आहे. दिवाळीत नाशिक शहरात काढण्यात आलेल्या रेड्यांच्या मिरवणुकीत बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांवर नागरिकांकडून पुष्पवर्षाव करण्यात आला. अवघ्या महिन्याभरात ही जादू झाली आहे.
जे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आज नाशिककरांसाठी हिरो झाले आहेत, तेच महिन्यापूर्वीपर्यंत नाशिककरांच्या दृष्टीने झिरो होते.नोव्हेंबर २०२३ मध्ये पोलीस आयुक्त म्हणून नाशिकचा कारभार हाती घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यासाठी संदीप कर्णिक यांनी आपल्या पध्दतीने प्रयत्न सुरु केले. सीपी व्हाॅटसअप हेल्पलाइन नंबर जाहीर करुन सर्वसामान्यांना मदत मागता येईल, असे आवाहन केले. शहरातील गुन्हेगारी कशी रोखता येईल, हे जाणून घेण्यासाठी नागरिकांकडून काही सूचना असतील तर त्यासाठी पोलीस आयुक्त आपल्या दारी हा उपक्रमही राबविला.
गुन्ह्यांमधील विधिसंघर्षित बालकांचा वाढता सहभाग लक्षात घेत त्यांचे समूपदेशन करण्याचीही भूमिका घेतली. परंतु, या सर्व उपाययोजनांचा फारसा उपयोग होत नसल्याचे गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येवरुन दिसून आले. जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत या वर्षी ४२ हत्यांची नोंद नाशिकमध्ये झाली होती. लुटमार, हाणामारी, वाहनांची तोडफोड, खंडणी, अपहरण हे प्रकार तर नेहमीचे झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलीस आयुक्तांविषयी रोष वाढू लागला. पोलिसांनी कठोर भूमिका घेण्याची मागणी सातत्याने होऊ लागली. त्यासाठी तत्कालीन आयुक्त विष्णुदेव मिश्रा, कुलवंतकुमार सरंगल, दीपक पांडे यांनी केलेल्या कारवाईचे उदाहरण देण्यात येऊ लागले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नाशिकमधील वाढती गुन्हेगारी सत्ताधारी महायुतीसाठी त्रासदायक ठरण्याची चिन्हे दिसू लागल्याने शहरातील भाजपच्या तीनही आमदारांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कैफियत मांडली. त्याआधी मनसे-शिवसेना (उध्दव ठाकरे) यांनी वाढ्त्या गुन्हेगारीविरोधात संयुक्त मोर्चा काढला. महायुतीतील शिवसेनेचे (एकनाथ शिंदे ) मंत्री दादा भुसे यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन गुन्हेगारी आटोक्यात आणण्याची सूचना केली. अखेर सर्वबाजूने टीका होऊ लागल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना गुन्हेगारी मिटविण्यासाठी पूर्णपणे मोकळीक दिली असल्याचे नाशिकमधील एका कार्यक्रमानिमित्त आले असता जाहीर केले. त्यानंतर मात्र पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भूमिका बदलली.
एखाद्या हिंदी चित्रपटाप्रमाणे इंटरव्हलनंतर पूर्णपणे परिस्थिती पालटली. पोलिसांनी धडाधड राजकीय गुन्हेगारांविरुध्द कारवाईला सुरुवात केली. त्यात मग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, त्याचा मुलगा दीपक लोंढे, भाजपमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रवेश केलेला मामा राजवाडे, भाजपचा माजी नगरसेवक जगदीश पाटील, भाजपचे पदाधिकारी सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागूल यांच्यासह इतर अनेकांना पोलिसी हिसका बसला.
काही बड्या धेंडांना आयुक्तालयात बोलावून खास समज देण्यात आली. काही जण नाशिक सोडून पळाले. नाशिक जिल्हा-कायद्याचा बालेकिल्ला, हे सर्व गुन्हेगारांच्या तोंडीपाठ झाले. त्यांना रट्टे बसू लागले. सर्वसामान्य नागरिकांना पोलीस खरोखर आपल्यासाठी काहीतरी करताहेत, हा विश्वास आला. आपल्या भागातील गुन्हेगारीविषयी ते बिनधास्तपणे पोलिसांना कळवू लागले. अवघ्या महिन्याभरापूर्वीपर्यंत नाशिककरांच्या दृष्टीने झिरो असलेले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक धडाकेबाज कामगिरीमुळे हिरो झाले.
