मार्ग, थांबा, तिकीटासाठीच्या वेळेचे मूल्यमापन; चाचणीवेळी प्रवाशांना मोफत प्रवास

नाशिक : महापालिकेची शहर बस सेवा सुरू होण्याची घटीका समीप येत असताना आता या सेवेची विविध पातळीवर चाचणी केली जात आहे. बुधवारी नऊ मार्गावर बसद्वारे प्रवास, थांब्यांवर लागणारा लागणारा वेळ, तिकीट काढण्यास लागणारा कालावधी आदींचे मूल्यमापन करण्यात आले. प्रवाशांना मोफत प्रवास घडविण्यात आला. म्हणजे त्यांना तिकीटे दिली गेली. परंतु,

पैसे घेण्यात आले नाही. या माध्यमातून तिकीट यंत्राची चाचणी घेण्यात आली.

जवळपास दोन वर्षांनंतर दृष्टीपथास आलेली आणि वेगवेगळ्या कारणांमुळे रखडलेली महापालिकेची शहर बस सेवा एक ते १० जुलै या कालावधीत सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात नऊ मार्गावर ५० बस धावणार असून त्यासाठी प्रत्येकी १२५ वाहक, चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नऊ मार्गावर एकूण २४० थांबे आहेत. या मार्गासह थांब्यांचा चालक-वाहकांना यापूर्वीच परिचय करून देण्यात आला आहे. बुधवारी सात मोठय़ा आणि दोन लहान बस रस्त्यावर धावल्या. मोठय़ा ४२ तर लहान बस २८ प्रवासी क्षमतेच्या आहेत. तपोवन स्थानकातून पाच तर नाशिकरोड स्थानकातून चार बस विहित नऊ मार्गावर चालविण्यात आल्या. या चाचणीतून मार्गावर एक फेरी मारण्यास किती कालावधी लागतो याचे अवलोकन करण्यात आले.

प्रवाश्यांची चढ-उतार होण्यास प्रत्येक थांब्यावर किती वेळ थांबावे लागेल याची प्रत्यक्षात तपासणी झाली. थांब्यावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये स्थान देण्यात आले. वाहकांनी प्रवाशांची यंत्रातून तिकीटे काढली. परंतु, चाचणी असल्याने प्रवासाचे पैसे घेतले गेले नाही. तिकीट काढताना किती वेळ लागतो, पुढील थांबा येईपर्यंत प्रवाशांना तिकीट मिळेल का, अशा अनेक बाबी तपासण्यात आल्या. या सेवेसाठी

२५ हजार रुपये किंमतीचे

तिकीट यंत्र वाहकांना देण्यात आले आहे. गुरूवारी याच पध्दतीने नऊ मार्गावर चाचणी केली जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सध्या नागरिकांना रिक्षाशिवाय प्रवासासाठी दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे मनपाच्या चकचकीत बसद्वारे लवकरात लवकर सेवा सुरू करावी, अशी बहुतेकांची अपेक्षा आहे. बस सेवेच्या अनुषंगाने बांधकाम, गॅस, पुरवठा, भ्रमणध्वनी अ‍ॅप, मनुष्यबळ आदींची पूर्तता केली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.