धुळे : शहरातील एका व्यक्तीला मंकी पॉक्सची लागण झाल्याचे सलग सहाव्या वैद्यकीय चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. गेल्या महिनाभरापासून या रुग्णावर वैद्यकीय पथकाने विशेष काळजी घेत उपचार सुरू ठेवले आहेत. सौदी अरेबियाहून परतण्या आधीच संबंधित व्यक्तीची प्रकृती बिघडकेली होती.यामुळे त्याने खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतले होते. धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णाला मंकी पॉक्स मधलाच दुर्मीळ व अतिसंसर्गजन्य असा क्लॅड-१ प्रकारचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्राथमिक लक्षणांनुसार विविध औषधोपचार करूनही सुधारणा न झाल्याने अखेर त्याने हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात धाव घेतली. येथील वैद्यकीय पथकाने त्याला लग्न झालेल्या आजाराची लक्षणे पाहून आणि पूर्वीच्या उपचारांचा आढावा घेतल्यानंतर मंकी पॉक्सचा संशय व्यक्त केला. त्यानंतर आवश्यक असलेली वैद्यकीय चाचणी करून घेण्यासाठी नमुने घेतले व ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.त्याच्या वैद्यकीय चाचणीचे एकापाठोपाठ एक असे सहा चाचणी अहवाला मंकी पॉक्स सकारात्मक आल्याने वैद्यकीय यंत्रणा अखेर या आजाराबाबत अधिक सज्ज झाली. या रुग्णावर गेल्या महिन्यापासून स्वतंत्र खोलीत दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्याच्या उपचाराला जवळपास ४४ दिवस झाले असून प्रारंभी त्याने सौदी अरबमध्येही उपचार घेतले होते. सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसत असली तरी नमुन्यांचे अहवाल अद्याप सकारात्मक येत आहेत. त्यामुळे पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्हि) नवीन नमुने पाठवून अंतिम पुष्टी मागविण्यात आली आहे. या आजारात किमान ६० दिवस लक्षणे टिकतात, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. अजित पाठक म्हणाले की, “रुग्ण आमच्याकडे २ नोव्हेंबर २०२५ रोजी दाखल झाला असून त्याला पूर्णपणे विलगीकरणात ठेवले आहे. वैद्यकीय चाचणीसाठी पहिला नमुना एनआयव्ही पुणे येथे पाठविल्यानंतर तो सकारात्मक आला. त्यानंतरचे सर्व सात नमुनेही सकारात्मक आले आहेत. आता पुन्हा आठवा नमुना तपासणीसाठी पाठविला असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईलही अपेक्षा आहे.” सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून अन्य कुणाला त्याचा संसर्ग झालेला नाही.खबरदारी म्हणून या रुग्णा संदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना माहिती देण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे म्हणाले की, “रुग्णावर नियमित औषधोपचार सुरू असून त्याला विलगीकरणात ठेवले आहे. त्याच्यापासून अन्य कुणालाही संसर्ग झालेला नाही, ही दिलासादायक बाब आहे.”
काळजी कशी घ्यावी : –
मंकीपॉक्स बाधित रुग्णाची काळजी घेण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक आणि नियमबद्ध पद्धतीने वागणे आवश्यक आहे. रुग्णाला स्वतंत्र खोलीत ठेवावे. त्याच्याशी थेट संपर्क टाळावा. संक्रमण पूर्णपणे थांबेपर्यंत त्याला बाहेरील व्यक्तींशी भेटू देऊ नये. रुग्णाची दररोज तापमान, रक्तदाब, आणि त्वचेवरील जखमांचे निरीक्षण करणे आवश्यक असून अन्न, द्रवपदार्थ आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार द्यावीत. रुग्णाच्या वापरातील वस्तू उशी, कपडे, टॉवेल, भांडी इत्यादी स्वतंत्र ठेवावीत. दररोज साबण-पाण्याने आणि जंतुनाशकाने त्या वस्तू स्वच्छ कराव्यात. डॉक्टर, नर्स किंवा कुटुंबातील सदस्यांनी रुग्णाजवळ जाताना आवश्यक ती खबरदारी म्हणून मास्क,ग्लोव्हज आणि पीपीइ किट वापरावे. स्पर्शानंतर हात नीट धुवावेत किंवा सॅनिटायझर वापरावे, रुग्णाला हलका, पौष्टिक आणि पचायला सोपा आहार द्यावा. फळांचा रस, सूप, पाणी आणि द्रव पदार्थ पुरेशा प्रमाणात द्यावेत.
रुग्णाला पुरेशी झोप आणि आराम आवश्यक आहे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मानसिक शांतता टिकवावी.त्वचेवरील पूरळ किंवा जखमा सारख्या जागेला स्पर्श करू नये किंवा खाजवू नये. जखमा कोरड्या ठेवाव्यात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध लावावे. आणि कुटुंबाचा रुग्णाशी संपर्क झाल्यास तत्काळ हात धुवावेत. संसर्गाची शंका वाटल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.रुग्णाला घाबरवू नये. त्याला सकारात्मक बोलावे, कारण मंकीपॉक्स बरा होऊ शकतो. मनःशांतीसाठी हलका संगीत किंवा वाचन उपयोगी ठरते. डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचे वेळेवर सेवन करावे आणि नियमित तपासणी करावी. स्वतःहून कोणतेही घरगुती उपचार किंवा औषधे घेऊ नयेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.
