नाशिक : दरवर्षी ११५ हून अधिक शिक्षणक्रमाद्वारे सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण पद्धतीने ज्ञानदान करणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चूलतबंधू प्रसेनजीत फडणवीस यांचा समावेश झाला आहे.

राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर तीन सदस्यांची नियुक्ती केली आहे. यात पुणे ये्थील एसपीपीयू एज्युटेकचे प्रमुख प्रसेनजीत फडणवीस. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील डॉ. दत्तात्रय गुजराथी आणि आयआयटी पवई येथील हवामान अभ्यास केंद्रातील सहायक प्राध्यापिका डॉ. अक्षया निकुंभ यांचा समावेश आहे. विद्यापीठ अधिनियमान्वये विद्यापीठाचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालविण्यासाठी राज्यपाल व्यवस्थापन मंडळावर सदस्य नियुक्त करतात. या सदस्यांची व्यवस्थापन मंडळावर तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल भवनकडून झालेल्या या नियुक्त्यांवर विदर्भ आणि मराठवाडा भागातून आक्षेप घेतला जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे चुलतबंधू असणारे प्रसेनजीत फडणवीस हे सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अधिसभा सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्याआधी ते याच विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणूनही कार्यरत होते. शिक्षणतज्ज्ञ, सायबर कायदे सल्लागार आणि बौद्धिक संपदा विषयात ते काम करतात. मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळात नियुक्त झालेले डॉ.. दत्तात्रय गुजराथी हे व्यवस्थापन आणि वाणिज्य क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. आयआयटी पवईच्या सहायक प्राध्यापिका डॉ. अक्षया निकुंभ या मागील वर्षी सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्याचे सांगितले जाते. गाठीशी फारसा अनुभव नसतानाही त्यांची मुक्त विद्यापीठात नियुक्ती झाल्याकडे शिक्षण क्षेत्रातील मंडळींकडून लक्ष वेधले जाते. नियमित शिक्षण प्रणालीतून मुक्त शिक्षण पद्धतीकडील या सदस्यांचा प्रवास शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनाही आश्चर्यचकीत करणारा ठरला आहे.

व्यवस्थापन मंडळातील नियुक्तीने प्रादेशिक वादाला तोंड फुटले आहे. नियुक्त केलेले तीनही सदस्य मुंबई, पुणे आणि अहिल्यानगर भागातील आहेत. मुक्त विद्यापीठाचे संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र आहे. राज्यपालांनी व्यवस्थापन मंडळावर सदस्य नियुक्तीत विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय केल्याची तक्रार होत आहे. मुक्त विद्यापीठाचा मूळ उद्देश ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलेले नाही, त्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवणे आहे. मुंबई, पुणे, अहिल्यानगर हे शैक्षणिकदृष्ट्या प्रगत भाग आहेत. ज्या भागापर्यंत शिक्षण पोहोचले नाही, त्या भागास प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे असल्याचा मुद्दा विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खड्डकार यांनी मांडला. दरम्यान, मुक्त विद्यापीठाला हे तीन तज्ज्ञ सदस्य लाभले. त्यामुळे विद्यापीठ प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास विद्यापीठाकडून व्यक्त केला जात आहे.