लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: अडीच वर्षांच्या सत्ताकाळात घरात बसून सरकार चालविणार्‍यांनी आमच्यावर टीका करू नये. शासन आपल्या दारी येतं, अनेक लोकांना लाभ देतंय, हे पाहून अनेकांना पोटदुखी झाली आहे. या पोटदुखीवर इलाज करण्यासाठी लवकरच आम्ही डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम सुरू करणार आहोत. त्यात त्यांच्या पोटदुखीवरही इलाज होईल, असा जोरदार टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना हाणला.

शासनाच्या लोककल्याणकारी योजना व व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळावा यासाठी राज्य शासनातर्फे राज्यभर शासन आपल्या दारी हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जिल्हानिहाय सुरू आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून मंगळवारी तालुकास्तरीय शासन आपल्या दारी उपक्रम पाचोरा येथे घेण्यात आला. व्यासपीठावर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मदत व पुनवर्सनमंत्री अनिल पाटील, ग्रामविकासमंत्री व पर्यटनमंत्री गिरीश महाजन आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाची सुरुवात अहिराणीतून केली.

हेही वाचा… “लाभार्थ्यांना मदत द्यायची तर ती घरपोच द्या”, बाळासाहेब थोरात यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री पवार, मंत्री महाजन, अनिल पाटील यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेचे वाक्बाण सोडले. मुख्यमंत्री शिंदे यांनी, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील जनतेला एकगठ्ठा पद्धतीने देण्याचा प्रयत्न शासन आपल्या दारी या उपक्रमातून करीत असून, याच्या पुढच्या टप्प्यात डॉक्टर आपल्या दारी, तसेच महिला बचत गटांना बळ देण्याचे काम शासन हाती घेणार असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा… दुधात भेसळ केल्यास खबरदार… चाळीसगाव, एरंडोलमध्ये कारवाई

मात्र, शासनाच्या या सर्व चांगल्या गोष्टींचा धसका घेऊन विरोधक मात्र आमच्यावर तथ्यहीन टीका करीत असून, या पोटदुखीवाल्यांनी पाटणकरांचा काढा घेण्याचा खोचक सल्लाही त्यांनी देत जळगावमधील सभेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर पलटवार केला. शासन आपल्या दारी थापा मारतात लई भारी, असे काही उद्धट लोक बोलतात. बसले अडीच वर्षे घरी, माहिती घेताहेत वरी वरी… पण आमचं शासन जातंय घरोघरी… लाभार्थ्यांना देतंय स्टेजवरी… सर्वसामान्यांसाठी अहोरात्र काम करी. म्हणून लाखोंची गर्दी होतेय कार्यक्रमांवरी… असे कवितेरूपी भाषण करीत हा कार्यक्रम प्रदर्शन करण्यासाठी नाही. तुम्ही घरी बसलात. आम्ही लोकांच्या दारी जातोय. लोकांना मदत करतोय. तुम्ही का केली नाही मदत? तुम्हाला संधी होती. आता तुम्हाला पोटदुखी का होते? कारण, आम्ही काम करतोय. त्याचा लोकांमध्ये चांगला प्रत्यय येतोय, असे शिंदे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंची किव वाटते- महाजन

कार्यक्रमात मंत्री महाजन यांनी उध्दव ठाकरे यांच्या वर टीका केली. राममंदिराचे भव्यदिव्य निर्माण होत असताना उद्धव ठाकरेंची टीका दुर्दैवी आहे. डिसेंबर-जानेवारीत मंदिराचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सोहळ्यास उपस्थिती राहणार आहे. मात्र, उद्धव ठाकरेंच्या डोक्यामध्ये काय कल्पना आली, राममंदिरासाठी त्या ठिकाणी दंगली करणार आहेत. त्यातून भाजप राजकारणाची पोळी शेकून घेणार आहेत, असे ठाकरेंनी भाष्य केले. मात्र, केंद्र व राज्यात विकासाची घोडदौड सुरू असताना उद्धव ठाकरेंना राममंदिराच्या निर्माणात दंगलीचा कट दिसतो आहे. यामुळे त्यांची किव करावीशी वाटते, तर संजय राऊत यांच्याबाबत बोलायलाच नको, असे महाजन यांनी सांगितले.

सतत बालिश वक्तव्य करून ठाकरे लोकांची दिशाभूल करीत आहेत. त्यांच्यामागे कोणी नसल्याने ते अस्वस्थ आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला. महाजन यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला मिळवण्यासाठी आम्ही कटिबंध असून, बलून बंधार्‍यांबाबतची प्रक्रिया आता शेवटच्या टप्यात आहे. यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी लक्ष घालावे, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केळी, कापसावर प्रक्रिया उद्योगांसाठी प्रयत्न अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहेत आणि सर्वांत जास्त ठिबकचा वापर करणारा जळगाव जिल्हा आहे. नैसर्गिक संकटे आल्यानंतर राज्यकर्त्यांनी घाबरून जायचे नसते, मागे हटायचे नसते, उलट जनतेला त्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करायचे असते. केळी व कापसावर प्रक्रिया उद्योग येत्या काळात जिल्ह्यात उभे राहायला हवेत, यासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच तिन्ही मंत्र्यांसह आमदार-खासदारांचा प्रयत्न आहे. तिन्ही मंत्र्यांनी जिल्हावासियांना न्याय मिळवून द्यावा. शेतकर्‍यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. शासन आपल्या पाठीशी उभे आहे. एक रुपयात पीकविमा हा ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. लोकांची कामे व्हावीत यासाठी आम्ही सत्तेत सहभागी झालो, असे सांगत पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही स्तुतिसुमने उधळली. मराठा आरक्षणावरही पवार यांनी भाष्य करीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वपक्षीय चर्चा झाली आहे. इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का लागू न देता न्याय तो देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांनी राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.