क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू तयार होत आहेत. स्पर्धा कुठलीही असो, विरोधक कोणीही असो पूर्ण ताकदीने उतरत मैदान गाजवले पाहिजे, असे आवाहन करतानाच पोलीस दलास सरकार आवश्यक सुविधा देण्यासाठी कटीबध्द आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी केंद्राच्या मैदानात ३४ व्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते गुरुवारी झाले. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, विविध परीक्षेत्राचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>> या मोर्चेकऱ्यांच्या घोषणांनी जळगाव दुमदुमले, प्रलंबित प्रश्‍नांसाठी लोकसंघर्षचा बिर्‍हाड मोर्चा

यावेळी, विविध परीक्षेत्र, पोलीस दलाच्या विविध विभागांकडून मुख्यमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. स्पर्धेत हार-जीत होत असते. कायद्याचे रक्षण करणाऱ्या घटकाकडे बळ, जिद्द, चिकाटी अंगी भिनावी यासाठी अशा स्पर्धांची गरज आहे. या खेळाडुंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नाव उंचवावे, राज्याची मान उंचवावी. शासन पाठीशी आहे. या स्पर्धेमुळे अधिकारी-कर्मचारी दरी कमी होत असून एक बंध दोघांमध्ये तयार होत आहे. खेळामुळे खिलाडुवृत्ती तयार होते. कार्यक्षमता वाढते. महाराष्ट्र पोलिसांची कार्यक्षमता स्कॉटलंडच्या पोलिसांच्या बरोबरीने आहे. आज पोलिसांवरील ताण पाहता त्यांना आरोग्य सुविधेसह, नैमित्तिक रजा, भरती प्रक्रिया यावर काम होत आहे. पोलीस दलासाठी, क्रीडा संकुलांसाठी निधी मंजूर करण्यात आला असून सरकार आवश्यक सुविधा देण्यासाठी कटीबध्द आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.

हेही वाचा >>> गाव चलो अभियानात भाजपचे दिंडोरी मतदारसंघावर लक्ष; मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांचा ३०० गावांत मुक्काम

पोलीस महासंचालक शुक्ला यांनी, पोलीस क्रीडा स्पर्धांची माहिती दिली. याआधी नाशिकमध्ये दोन वेळा या राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या आहेत. यंदा स्पर्धेत दोन हजार ८४८ स्पर्धक सहभागी झाले आहेत. पाच खेळाडुंचे प्राविण्य पाहता त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून काहींना बढती देण्यात आली आहे. पोलीस दल खेळाडुंना प्रोत्साहन देत असल्याचे शुक्ला यांनी सांगितले.

विरोधक कोणीही असो…

पोलीस क्रीडा स्पर्धा उद्घाटन समारंभ सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पर्धेतील खेळाडुंना स्पर्धेचे महत्व पटवून देतांना राजकीय टोलेबाजीही केली. स्पर्धेतून खेळाडू तयार होतात. स्पर्धेसाठी मैदान महत्वाचे असते तसे विरोधकही. विरोधक कोणीही असो, स्पर्धेत संपूर्ण ताकदीने उतरुन मैदान आपण गाजवले पाहिजे. समोरील चाल लक्षात घेत आपली आखणी केली पाहिजे, असा सल्ला त्यांनी खेळाडुंना दिला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde inaugurated 34th state level police sports competition in nashik zws
First published on: 08-02-2024 at 20:19 IST