नंदुरबार – नदीवर आडव्या पडलेल्या एका झाडाच्या फांदीवरुन चालत नंदुरबार जिल्ह्यातील केलखाडी गावातील विद्यार्थी नदी ओलांडून शाळा गाठत असल्याचे धोकादायक वास्तव दै लोकसत्ताने मांडल्यानंतर नंदुरबार जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने महिनाभराच्या आत नदीवर साकव उभारण्याचे काम पूर्ण करुन दाखवले आहे. त्यामुळे केलखाडीच्या विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांचा प्रवास सुकर झाला आहे. या साकवमुळे (पूल) या परिसरातील गावपाड्याच्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. दररोज धोकादायक पध्दतीने नदी ओलांडण्याची चिंता मिटली आहे.

नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात केलखाडी हा पाडा आहे. या परिसरातील विद्यार्थ्यांना नदीपलीकडे असलेली शाळा गाठण्यासाठी नदीवर आडव्या पडलेल्या एका झाडाच्या फांदीचा आधार घ्यावा लागत होता. नदीवर आडव्या पडलेल्या फांदीवरुन चालत विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत होता. त्यातच केलखाडी नदीला पूर आलेला असल्यास धोका अधिकच वाढत होता. झाडाच्या फांदीवरुन विद्यार्थ्यांसह अंगणवाडी सेविका, आशा मदतनीस आणि ग्रामस्थांनाही जीव मुठीत घेऊन कामासाठी नदी ओलांडणे भाग पडत होते.. विद्यार्थ्यांसह परिसरातील ग्रामस्थांचा हा धोकादायक प्रवास दै. लोकसत्ताने सर्वांसमोर आणल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेवर अनेकांनी टिकास्त्र सोडले होते.

अखेर याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंदुरबार जिल्हा प्रशासनाला केलखाडी नदीवर तातडीने साकव बांधण्याचे आदेश दिले होते. यामुळे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी स्वत: लक्ष देत शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने महिनाभराच्या आत केलखाडी नदीवर साकव तयार करुन दाखवला. सुमारे २९ लाख ५० हजार रुपये खर्च करुन साकव उभारण्यात आला आहे. १७ जुलै रोजी कार्यारभ आदेश देण्यात आला होता. महिना पूर्ण होत नाही तोच या साकवचे काम पूर्ण झाले आहे. केलखाडी नदी सध्या पावसामुळे पाणी असल्याने या साकवचा परिसरातील आदिवासी बांधवांना लाभ होत आहे.

कधी याठिकाणी असा साकव (पूल) उभारला जाईल, हे स्वप्नातही परिसरातील ग्रामस्थांना वाटले नव्हते. परंतु, आता हा साकव बनल्यानंतर या साकवपर्यंतचा रस्तादेखील होईल, असा आशावाद आदिवासी ग्रामस्थांना वाटू लागला आहे. नंदुरबार जिल्ह्यात पावसाळ्यात धोकादायक वाटावीत, अशी अनेक ठिकाणे आहेत. नद्यांना पाणी आल्यावर अशा ३५० पेक्षा अधिक वाड्या-पाड्यांचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. त्यामुळे काही ठिकाणी जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना नदी ओलांडणे भाग पडते. पालकमंत्री माणिक कोकाटे आणि जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी अशा ठिकाणी लक्ष देत प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारच्या साकवची उभारणी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.