नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाच्या विस्तारीकरणासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एनएमआरडीएने रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू केले होते. चुकीच्या पद्धतीने ही कारवाई होत असल्याची तक्रार करीत स्थानिक शेतकऱ्यांनी या विरोधात साखळी उपोषण सुरू केले. काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर काही प्रकरणात स्थगिती दिली गेली. या संदर्भात राष्ट्रवादीचे (अजित पवार) हिरामण खोसकर व सरोज अहिरे या आमदारांच्या नेतृत्वाखाली साधू-महंत व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सर्वांचे म्हणणे जाणून घेत त्यांनी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला तात्पुरती स्थगिती दिली.
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या मध्यापासून ५० मीटर दोन्ही बाजुची जागा मोकळी करण्याचे एनएमआरडीएचे नियोजन आहे. या क्षेत्रातील हॉटेल, शेडवर कारवाई झाली. अनेक शेतकऱ्यांची घरे तोडण्यात आली. पेगलवाडी-महिरावणी या रस्त्यावरील दोन्ही बाजुची बांधकामे हटविली जात आहे. या कारवाई विरोधात महिरावणी येथे शेतकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले. याआधी स्थानिकांनी रास्ता रोको करीत काळी दिवाळी साजरी केली होती. एनएमआरडीएच्या कारवाईवरून सत्ताधारी पक्षाचे आमदार सरोज अहिरे आणि हिरामण खोसकर यांच्यासह त्र्यंबकेश्वरमधील साधू-महंतही मैदानात उतरले आहेत. या संदर्भात आ.अहिरे, खोसकर यांच्यासह साधू-महंत व शेतकऱ्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत एनएमआरडीने चुकीच्या पद्धतीने चालविलेली मोहीम थांबविण्याची मागणी केली.
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत आहे. त्याचवेळी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. रस्त्याला स्थानिकांचा विरोध नाही. परंतु, एनएमआरडीए रस्त्यालगतची अतिरिक्त जागा जबरदस्तीने घेत असल्याचा आरोप आमदार अहिरे यांनी केला. एनएमआरडीएच्या चुकीच्या कृतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
अतिक्रमण मोहिमेमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी आणि जागा हवी असल्यास रितसर भू संपादन कायद्याप्रमाणे जमिनी संपादीत कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. बैठकीतील चर्चेअंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला तात्पुरती स्थगिती दिल्याची माहिती आ. अहिरे यांनी दिली. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांना नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
