नाशिक : प्रदीर्घ कालावधीनंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार बुधवारपासून शहर परिसरातील महाविद्यालये सुरू  झाली. मात्र पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. कट्टय़ांवरही मैफल रंगली नाही. काही महाविद्यालयात  गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

जिल्ह्यात १६१ महाविद्यालयातून चार लाख विद्यार्थी महाविद्यालयात येणे अपेक्षित होते. मात्र महाविद्यालयीन वर्तुळात हा अंदाज  चुकला. लसीकरणाची दोन मात्रा बंधनकारक असल्याने उपस्थितीवर याचा परिणाम जाणवला. ही उपस्थिती पुढे वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.  पुणे किंवा अन्य विद्यापीठाकडून महाविद्यालय सुरू करण्याविषयी केवळ मोघम आदेश देण्यात आले आहेत. किती क्षमतेने, कुठले वर्ग याविषयी माहिती नसल्याने महाविद्यालय स्तरावरही संभ्रम आहे.

महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशद्वारावर तापमान नोंद करण्यात येत होती. ओळखपत्र तपासणी केल्याशिवाय विद्यार्थ्यांना महाविद्यालयात घेतले जात नव्हते. प्रवेशद्वारावर तोंडावर असलेली मुखपट्टी महाविद्यालयाच्या आवारात येताच बाजुला झाली. करोनाविषयक नियमांचा अनेक ठिकाणी विसर पडला. महाविद्यालयातील सुरक्षा रक्षकांकडून याविषयी वारंवार सूचना करण्यात येत होत्या. 

पुणे विद्यापीठाच्या सुचनेनुसार महाविद्यालय सुरू झाले. १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला गेला. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे त्यांच्यासाठी महाविद्यालयाच्या आवारातच एखादे शिबीर घेता येईल का? याबाबत विचार सुरू आहे, असे के. टी. एच. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी सांगितले.  

बैलगाडीतून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाहतूक

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सातत्याने होणाऱ्या दरवाढीचा निषेध बुधवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आला. महविद्यालयीन विद्यार्थ्यांची बैलगाडीतून वाहतूक करून आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन झाले. महाविद्यालय सुरु होण्याच्या बुधवारच्या दिवशी विद्यार्थ्यांना बैलगाडीच्या माध्यमातून महाविद्यालयात सोडून हे उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने ही दरवाढ रोखून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी डॉ. अमोल वाजे, जीवन रायते, पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळा निगळ, विभाग अध्यक्ष निलेश भंदुरे, विशाल डोके, रामदास मेदगे, समाधान तिवडे व कार्यकर्ते उपस्थित होते.