अंजली भागवतचे मनोगत
नेमबाजीमुळे मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते. या खेळामध्ये काही तासांपेक्षा अगदी थोडा वेळ केलेला सरावही एकाग्रतेने केला जातो. त्याचा फायदा मुलांना अभ्यासात होतो, असे प्रतिपादन ऑलिम्पियन व राजीव गांधी खेलरत्न पारितोषिक विजेती नेमबाजपटू अंजली भागवत यांनी केले.
येथील विभागीय क्रीडा संकुलात विनर्स शुटींग क्लबतर्फे आयोजित नेमबाजी प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी अंजवली भागवत यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रसिद्ध क्रीडा मानसशास्त्र भिष्मराज बाम, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, आदी उपस्थित होते. आजकाल मुलांवर अभ्यासाचा इतका बोजा असतो की अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी वेळ कसा द्यावा, हा प्रश्न पालक आणि मुलांसमोर असतो. वेळ दिलाच तर अभ्यासावर परिणाम होईल, अशी भीती त्यांना असते. परंतु, नेमबाजीमुले एकाग्रता वाढण्यास मदत होऊन त्याचा अभ्यासातही फायदा होतो. या खेळामध्ये जे राहून गेलं ते भरून काढण्याचे आव्हान असते. दररोज हे आव्हान स्वीकारण्याची सवय लागते. तीच सवय अभ्यास व दररोजच्या आयुष्यातही लागते. ज्यावेळेला तुम्हाला मनातून हा खेळ आयुष्याचा अविभाज्य घटक आहे, असे वाटेल. त्यावेळी तुम्ही इथे टिकू शकता, असा विश्वासही अंजली भागवत यांनी उपस्थितांना दिला.
भिष्मराज बाम यांनी स्वभावाचा परिणाम खेळावर होत असल्याचे नमूद केले. असलेली पात्रता सरावाने वाढवली तरच पुढे जाता येते. या केंद्रामार्फत नेमबाजीमध्ये ज्यांना प्रशिक्षण घ्यायचे आहे, त्यांना नेमबाजीचे प्राथमिक धडे दिले जाणार आहेत. नेमबाजी स्पर्धात्मक स्तरावर खेळण्यासाठीही तयारी करून घेतली जाईल. या खेळाला वयाची अट नसल्याने ११ वर्षांपुढील सर्व या खेळाचा सराव करू शकतात. ज्या व्यक्तींमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची पात्रता आहे, परंतु आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. अशा व्यक्तींसाठी आर्थिक सहाय्य उभे करण्याचे काम संस्था करेल, असेही त्यांनी नमूद केले.
बाम यांनी स्वत: केंद्रासाठी २० हजार रुपयांची देणगी दिली संस्थेच्या प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेच्या पंच श्रद्धा नालमवार या काम पाहणार  आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी संस्थेच्या संपूर्ण कार्यात सहकार्याचे आश्वासन दिले. जिल्हा नेमबाजी संघटनेच्या सचिव मोनाली गोऱ्हे यांनी आभार मानले.
जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धा
नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत यश मिळविणाऱ्या खेळाडुंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेचे  उद्घाटन जिम्नॅस्टिक प्रशिक्षक संदीप शिंदे, क्रीडा अधिकारी रेखा परदेशी यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत शहरी व ग्रामीण अशो दोन गटात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.