जळगाव – शहरातील प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर असला, तरी पुरेशा निधीअभावी काही रस्त्यांची कामे तशीच अर्धवट सोडून दिली आहेत. तर काही रस्त्यांची कामे संथपणे सुरू आहेत. परिणामी, पावसाळ्यात खोलगट भागात तसेच खड्ड्यांमध्ये पाण्याची डबकी साचू लागल्याने नागरिकांना त्यातून वाट काढताना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.

जळगाव शहर खड्डेमुक्त करण्यासाठी सुमारे १८५ कोटी रूपयांच्या निधीतून काही प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जात आहे. मंजूर निधीतून निधीतून अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचा दावाही केला जात आहे. प्रत्यक्षात, संबंधित कंत्राटदारांना वेळेवर पूर्ण झालेल्या कामांची देयके न मिळाल्याने अनेक रस्त्यांची कामे तशीच अर्धवट सोडून दिली आहेत. ज्या रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत, त्यांच्या कामांची गती अतिशय संथ असल्याचे दिसून येत आहे.

प्रलंबित देयके वेळेवर न मिळाल्याने काही दिवसांपूर्वी कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देऊन जळगावमध्ये निदर्शनेही केली होती. प्रसंगी रस्त्यांची कामे थांबविण्याचा इशारा दिला होता. अशा स्थितीत, महापालिकेचे प्रशासन रस्त्यांची कामे करून घेण्याची जबाबदारी पार पाडण्याऐवजी त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या दीड-दोन वर्षांपासून जळगाव शहरातील आकाशवाणी ते लालबहादूर शास्त्री टॉवर चौक रस्त्याचे काँक्रिटीकरण रखडले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह इतरही अनेक महत्वाची शासकीय कार्यालये, मध्यवर्ती बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल, स्टेट बँक, नंदिनीबाई मुलींचे महाविद्यालय, ला. ना. सार्वजनिक आणि विद्यानिकेतन शाळा, भाजपचे जिल्हा कार्यालय, पुढे रेल्वे स्थानक, मुख्य बाजारपेठ असलेला हा रस्ता म्हणजे शहराचा राजमार्गच आहे. त्यावर एसटीच्या बसेस तसेच चारचाकी व दुचाकी वाहनांची सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. असे असताना, या रस्त्याच्या कामाला इतक्या दिवसात चालना मिळालेली नाही.

महापालिकेने जळगाव शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी सुमारे दोन कोटी रूपयांची तरतूद केली आहे. पावसाने उघडीप दिल्यावर लगेच दुरूस्तीचे काम सुरू करण्यात येईल. – योगेश बोरोले (शहर अभियंता, महापालिका, जळगाव)