scorecardresearch

नाशिक : जिल्हा बँकेच्या कारवाईविरोधात कायदेशीर लढा ; शेतकरी संघटना समन्वय समितीचा सोमवारी मेळावा

सकाळी ११ वाजता पिंपळगाव बसवंतच्या घोडकेनगर येथे बँक कर्जदार शेतकऱ्यांसाठी कायदेशीर सल्ला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक : जिल्हा बँकेच्या कारवाईविरोधात कायदेशीर लढा ; शेतकरी संघटना समन्वय समितीचा सोमवारी मेळावा
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

जिल्हा मध्यवर्ती बँकेने हजारो थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटीस पाठवत त्यांच्या सातबाऱ्यावर बँकेचे नाव लावण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. या कारवाईमुळे वयोवृध्दांसह अन्य शेतकरी धास्तावले असून त्यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी शेतकरी संघटना समन्वय समितीच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता पिंपळगाव बसवंतच्या घोडकेनगर येथे बँक कर्जदार शेतकऱ्यांसाठी कायदेशीर सल्ला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> नाशिकचे रखडलेले प्रकल्प लवकरच मार्गी ; चंद्रशेखर बावनकुळे यांचे ” होमेथॉन ” मध्ये आश्वासन

या बाबतची माहिती शेतकरी संघटना समन्वय समितीचे राज्याध्यक्ष भगवान बोराडे यांनी दिली. हजारो कोटींच्या थकीत कर्जामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत आली आहे. बँकेवर प्रशासक नियुक्त असून त्यांच्यामार्फत थकीत कर्जाच्या वसुलीला प्राधान्य दिले जात आहे. त्या अंतर्गत जुन्या थकीत कर्ज वसुलीसाठी जमीन जप्त करून स्थावर मालमत्ता लिलावाची प्रक्रिया राबविली जाते. लिलावास प्रतिसाद न मिळाल्यास संबंधित स्थावर मालमत्ता अर्थात शेत जमिनीवर बँकेचे नाव लावले जाते. जिल्हा बँकेने जिल्ह्यातील हजारो थकबाकीदार सभासदांना अशा नोटीस पाठवत त्यांच्या सातबाऱ्यावर बँकेचे नाव लावण्याचे काम सुरू केल्याचे बोराडे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीतील कथित पैसे वाटपावरुन भालोद सोसायटी संचालकांमध्ये वाद

या कारवाईमुळे शेतकरी वर्गात अस्वस्थता आहे. यात ६० ते ७० वयोगटातील अनेक शेतकरी आहेत. आयुष्यभराची पुंजी डोळ्यासमोरुन जात असल्याचे पाहून ते धास्तावले आहेत. त्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने मेळाव्यातून यातून काय कायदेशीर मार्ग काढता येईल, यावर मार्गदर्शन केले जाणार असल्याचे बोराडे यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती बँक कर्जदार शेतकऱ्यांसाठी सोमवारी सकाळी पिंपळगाव बसवंत येथील घोडकेनगर येथे कायदेशीर सल्ला शिबिर होईल. यावेळी मुंबई येथील कायदेतज्ज्ञ शुभांगी शेरेकर या मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यात नोंदणीसाठी नियोजक समितीचे अध्यक्ष पुंडलिकराव गायकवाड व रामराव मोरे यांना ७७७६० १११४४ या क्रमांकावर संपर्क साधावा. ही लढाई कायदेशीर पद्धतीने लढण्यासाठी मेळाव्यात जास्तीत जास्त थकबाकीदार शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भगवान बोराडे यांनी केले आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-12-2022 at 21:01 IST

संबंधित बातम्या